पिंपरी चिंचवड: चिंचवड विधानसभेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नाना काटे यांचे बंड थंड झालं आहे. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले आहे. चिंचवडमधून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा देणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत नाना काटे यांनी अर्ज कायम ठेवले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काटे बंडखोरीवर ठाम होते. अखेर अजितदादांचा फोन झाल्यानंतर त्यांनी १ तास अगोदर माघार घेतली आहे. तसेच चिंचवड विधानसभेतून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांना या पोटनिवडणुकीत १ लाख ३५ हजार ४९४ मतं मिळाली होती. तर नाना काटे यांना ९९ हजार ४२४ मतं मिळाली. दुसरीकडे राहुल कलाटे यांनी ४० हजार ७५ मत मिळाली होती. त्यावेळी राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे राष्ट्रवादीची मतं विभागली गेली असल्याची प्रतिक्रिया काटेंनी पराभवानंतर दिली होती. आताच्या विधानसभेत नाना काटेंनी बंडखोरी केली. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती. परंतु काटेंच्या अपक्ष अर्ज मागे घेतल्याने तिरंगी ऐवजी दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिंचवडमध्ये आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.