नारायण बडगुजरपिंपरी : वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणे जिवावर बेतत असल्याचे अनेक अपघातांतून समोर आले आहे. त्यामुळे वाहनचालविताना मोबाईलवर बोलणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीही अनेक दुचाकीचालक अपघाताची किंवा दंडाची भीती न बाळगता मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून येते.
शहरातील नाशिक फाटा ते चाकण तसेच शिक्रापूर ते चाकण आणि तळेगाव दाभाडे ते चाकण या मार्गांसह काही रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. यात दुचाकीचालकांचा अपघात होऊन प्राणांतिक अपघात तसेच गंभीर दुखापतीचे अपघात होत आहेत. ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियम पालन करण्याचे पोलिसांकडून आवाहन केले जाते. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करून वाहने चालविली जातात. अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते.
मोबाईलवर बोलून दुचाकी चालविण्याचे प्रकार सर्रास दिसून येतात. थेट फोन कानाला लावून एका हाताने दुचाकी चानविणे, हेडफोन लावून मोबाईलवर बोलणे, ब्लूटूथचा वापर करून दुचाकी चालवित असल्याचे दिसून येते. अशा प्रकारांत लक्ष विचलीत होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असते. मात्र तरीही दुचाकीचालक फोनवर बोलणे टाळत नाहीत. परिणामी अपघात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तसेच अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे.
दंडाची रक्कम २०० रुपयेपिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून इ-चालानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार २०० रुपये दंड आकारण्यात येतो. दंडाची ही रक्कम वाहनचालकांना आॅनलाईन पद्धतीने भरावी लागते. चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून, त्यामाध्यमातूनही कारवाई करण्यावर वाहतूक पोलिसांचा भर आहे.
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वत:सह इतर वाहनचालकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. मोबाईलवर बोलत असताना दुचाकीचालक अचानक ब्रेक दाबणे, इण्डीकेटर न लावता अचानक वळण घेणे, गतीरोधकावर वेग कमी न करणे, सिग्लन तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर दुचाकी थांबविणे, असे प्रकार होतात. परिणामी अपघात होतात. याला आळा बसणे आवश्यक आहे. पोलिसांकडून कारवाई वाढविण्यात येणार आहे.- श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
मोबाईलवर बोलणाऱ्या दुचाकीचालकांवर झालेली कारवाई
वर्ष कारवाई दंड (रुपये) २०१९ - ५६,७९७ १२३९२०००२०२० - १९,७६५ ३९५२८०० -----------------------------