कामशेत : मावळ तालुक्यातील पाऊस, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्यातून खळखळणारे धबधबे, ऐतिहासिक वारसा जपणारे गड किल्ले, प्राचीन वास्तू, मंदिरे आणि जुनी गावे व गावांमधील प्रसन्न वातावरण, मोठ मोठे जलाशय हे मावळचे वैभव असून, मावळातील तुडुंब भरलेली धरणे ही मावळच्या समृद्धीची साक्ष देतात.लोणावळा खंडाळा या भागात पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने अनेक पर्यटक व ट्रेकर यागर्दीतून बाहेर निघून मावळातील नाणे-पवन-आंदर मावळातील पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी मावळ तालुक्यातील दुर्गम व अपरिचित स्थळे, पर्यटन स्थळे व निसर्ग सौंदर्याचा अद्भुत अविष्कार पर्यटकांना साद घालत आहे.मावळ तालुक्यातील नव्या नैसर्गिक स्थळांचा शोध घेत पर्यटक येथे पोहचू लागला आहे. उंचच्या उंच डोंगररांगा, शांत व प्रसन्न वातावरण हिरवाईने नटलेला परिसर, खळखळणारे फेसाळणारे धबधबे, पर्यटकांसह चित्रपट निर्मात्यानाही आकर्षित करू लागले आहेत. नाणे मावळत खास पावसाळ्यात निसर्गाची देखणी सजावट पाहण्यासाठी पर्यटकांचा लोंढा येथे येऊ लागला आहे. गावागावांमधील प्राचीन मंदिरे, तळी व इतर ऐतिहासिक वारसा जपणारी ठिकाणे आता गजबजू लागली आहेत. नाणे मावळत शिवकाळात मोठा बाजार भरत असे. या बाजाराला संत तुकाराममहाराज ही असे म्हणत अशी इतिहासात नोंद आहे.माथेरान, महाबळेश्वर : जांभवलीची तुलनाकामशेत शहरापासून नाणे रोड मार्गे १८ ते २० किलोमीटर पुढे शंभर एक उंबऱ्याची थोरण व जांभवली ही दोन गावे आहेत. ही गावे पावसाळ्यात जणू माथेरान महाबळेश्वर समान भासतात. या गावांकडे जाण्याच्या मार्गावर नाणे, कांबरे, गोवित्री, उकसान, भाजगाव, सोमवाडी, शिरदे आदी महत्त्वाची गावे व इतर वाड्यावस्त्या भेटतात. या शिवाय या मार्गावर प्रथम इंद्रायणी व नंतर कुंडलिका नद्यांचे दर्शनही घडते. ही दोन्ही गावे नाणे मावळच्या टोकाची गावे असून, सह्याद्रीच्या रांगामध्ये वसली आहेत. जांभवली गावाच्या तीन किलोमीटर पुढे प्राचीन कोंडेश्वर शिवमंदिर व त्यामागे बाराही महिने तुडुंब भरून वाहणारी तीन नैसर्गिक कुंड आहेत.वानरलिंगी डोंगर गिर्यारोहकांचे आकर्षणयेथूनच पुढे डोंगराच्या पायथ्याला वानरलिंगी डोंगर दिसतो. या डोंगर कड्यातील कपारीत विराजमान असलेल्या श्री क्षेत्र ढाकभैरी देवाचे दर्शन होते. अनेक गिर्यारोहक व ट्रेकर यांचा येथे कायमच वावर असतो. ढाकभैरीचे दर्शन घेण्यासाठी उभा कातळ चढावा लागत असल्याने माहीतगीर माणसाच्या मदतीने येथे जावे. कातळ चढून गेल्यास डोंगर कपारीत सुमारे २५ ते ३० जणांना पुरेल इतकी जागा आहे. याशिवाय आतमध्ये दोन पाण्याच्या खोदीव टाक्या आहेत. या टाक्यांमध्ये स्वयंपाकाची सर्व भांडी देखील आहेत. येथून घाटाखालचा परिसर व निसर्गाचे मनोहारी दृश्य दिसते.
नाणे मावळ परिसर : निसर्गरम्य गावांची पडतेय भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 2:00 AM