मोशी : २३ लाख रुपये.... एक वार..२३ लाख रुपये दोन वार आणि २३ लाख रुपये तीन वार या बोलीला निमित्त होते ते मोशीतील नागेश्वर महाराज उत्सवातील मानाच्या विड्याचे.. विजय सस्ते यांनी बोली लावून हा मानाचा विडा घेतला.. नागेश्वर महाराज उत्सवानिमित्त दरवर्षी लिलावाचे आयोजन करण्यात येत आहे. नागेश्वर महाराज उत्सवाला शिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे..उत्सवात वापरल्या गेलेल्या वस्तुंचा लिलाव तब्बल लाखोंच्या घरात गेला आहे.महाराजांवर मोशीकरांची मोठी श्रद्धा आहे. उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो.त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांना अर्पण केलेल्या वस्तूंची विक्री केली जाते.त्यामध्ये प्रामुख्याने नारळ,पेढे,फोटोसह महाप्रसाद बनविण्यासाठी आणलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात येतो.सुरवातीचे पहिले मानाचे लिंबू गणेश तुकाराम कुदळे यांनी ५ लाख ५१ हजार रुपयांना घेतले. सर्वांचे लक्ष्य लागून असलेल्या मानाच्या लिबू,ओटी व मानाच्या वीड्यासाठी लिलाव सुरु झाल्यानंतर मानाच्या ओटीची लिलावात संतोष सुदाम सस्ते यांनी १२ लाख ५१ हजार रुपये बोली लावून खरेदी केली.सर्वात शेवटी सर्वांचे लक्ष्य लागून असलेल्या शेवटचा मानाचा विड्याचा लिलाव सुरु झाल्यानंतर अनेकांनी श्वास रोखून धरला होता.शेवटचा मानाचा विडा विजय सस्ते यांनी २३ लाख रुपये बोली लावून खेरदी केले.गेल्या वर्षी देखील शेवटचा विडा त्यांनीच घेतला होता.
तब्बल २३ लाख रुपये मोजून जेव्हा उचलला जातो नागेश्वर महाराजांच्या उत्सवातील मानाचा विडा..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 7:28 PM