पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वी केलेल्या प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. स्वत:च्या बाळाचे नाव बदलायला हवे, दुस-याच्या मुलाचे नाव बदलण्याचा अधिकार कोणी दिला, अशी टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली आहे.भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर जुन्या प्रकल्पाचे नाव बदलण्याचा घाट भाजपाने घातला आहे. संभाजीनगर, शाहूनगर परिसरातील सदाशिव बहिरवाडे क्रीडांगणाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव क्षेत्रीय सभेत ठेवला आहे.याविषयी योगेश बहल म्हणाले, ‘‘भाजपाची सत्ता येऊन सहा महिने झाले़ पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराचा अनुभव आपण घेत आहोत. केवळ ठेकेदारांकडून वसुली सुरू आहे. मनमानी आणि हुकूमशाहीपद्धतीने काम सुरू आहे. टक्केवारीचे राजकारण सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांत राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने या शहराचा विकास केला. मात्र, जुन्याच प्रकल्पांची पुन्हा उद्घाटने केली जात आहेत. श्रेय लाटले जात आहे. संत तुकारामनगर परिसरात काम करीत असताना भाजपाचे वसंत शेवडे यांनी नगरसेवक असताना विकास कामे केली. त्या वेळी दीनदयाळ उपाध्याय शाळा, बी. डी. किल्लेदार उद्यान, जनरल अरुणकुमार वैद्य अग्निशामक दल अशी विविध प्रकल्पांना नावे दिली. या भागाचे नेतृत्व पंचवीस वर्षे करीत असताना आम्ही कधी विरोधकांनी तयार केलेल्या प्रकल्पांची नावे बदललेली नाही. दुसºयाच्या कामाचे श्रेय घेणे योग्य नाही. सुडाचे राजकारण सुरू आहे.’’सभागृहाचे कामकाज नियमांप्रमाणे चालत नाही. ते सभाशास्त्राच्या नियमानुसार आणि लोकशाही पद्धतीने चालू ठेवणे गरजेचे आहे. परंतु सभागृहात बोलू दिले जात नाही. नवोदित नगरसेवकांनाही अंधारात ठेवून कामकाज केले जात आहे. सभागृहात अधिकार नसलेले काही लोक आमचे माईक बंद करण्याचा आदेश देतात. माईक बंद करतात ही बाब चुकीची आहे, अशी टीका बहल यांनी केली.
प्रकल्पांची नावे बदलाचा घाट, भाजपा-राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरून जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:21 AM