पिंपरी : महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात राष्ट्रध्वज उभारला आहे. मात्र, उंची अधिक असल्याने वर्षातील निम्मे दिवस तो उतरविला जातो. दुरुस्ती करून हा ध्वज आजपासून फडकविण्यात आला आहे. पावसाळावगळता वर्षातील आठ महिने हा ध्वज फडकला जाईल, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या प्राधिकरणातील भक्ती-शक्ती चौकात २६ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रध्वज उभारला होता. हा राष्ट्रध्वज देशातील सर्वाधिक उंचीचा आहे, असा दावाही भाजपाने केला होता. मात्र, दहा महिन्यांत सर्वाधिक दिवस हा राष्ट्रध्वज उतरविला जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाने टीका केली. स्मशानभूमींना सल्लागार नेमता, तसे देशाभिमानाचे प्रतीक असणाºया राष्ट्रध्वजासाठी सल्लागार नेमा, असा सल्लाही दिला होता.‘ध्वजाची उंची अधिक आहे, तसेच वजनही अधिक आहे. त्यामुळे कापड फाटत आहे, असा खुलासा संबंधित संस्थेने केला होता. त्यानंतर वर्षात किती दिवस राष्ट्रध्वज उभारायचा याबाबत पंधरा आॅगस्टला महापौर राहुल जाधव धोरण जाहीर करणार होते. मात्र, त्यांनी ऐन वेळी या विषयावर बोलण्याचे टाळले होते. त्यानंतर आज सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी याबाबतचे धोरण जाहीर केले.