पिंपरी : आमच्या संघाकडून कबड्डी खेळ, असे म्हणून भाच्याने मामाला तलवार व कोयत्याने मारून दगडाने मारहाण केली. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील कबड्डीपटू यात गंभीर जखमी झाला. चिखली गावातील कमानीजवळ गुरुवारी ही घटना घडली.
संतोष बाळासाहेब मोरे (वय ३४, रा. चिखली गाव), असे गंभीर जखमी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ४) फिर्याद दिली आहे. राहुल यादव (रा. कुदळवाडी, चिखली), सोन्या नेवाळे, गौरव गावडे (दोघेही रा. चिखली), दोन अनोळखी इसम (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष मोरे हे कबड्डीपटू आहेत. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. आरोपी राहुल यादव हा फिर्यादी मोरे यांचा भाचा आहे. फिर्यादी हे गुरुवारी त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांचा भाचा आरोपी राहुल यादव व त्याचे मित्र असलेले इतर आरोपींनी तेथे येऊन बेकायदा जमाव केला. तू ब्रह्मा-विष्णू-महेश संघामधून कबड्डी खेळू नको, तू आमच्या ओम साई कबड्डी संघामधून खेळ, नाही तर मी तुला कबड्डी खेळण्याच्या लायक सोडणार नाही, असे आरोपी यादव फिर्यादी मोरे यांना म्हणाला. त्यानंतर त्याने त्याच्या हातातील तलवार फिर्यादी मोरे यांच्या डाव्या मांडीवर मारून जखमी केले. दगडाने डाव्या पायाच्या नडगीवर मारहाण करून खाली पाडून उजव्या पायाच्या नडगीवर कोयत्याने मारून फिर्यादी मोरे यांना गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख तपास करीत आहेत.