पिंपरी : काँग्रेसवगळता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या प्रमुख पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आयात केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल १० उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. भाजपाचे ६, शिवसेनेचे ४ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. बहुजन समाज पक्ष आणि अपक्ष उमेदवारही याला अपवाद राहिले नाहीत. एकीकडे शहर भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करण्याची भाषा राजकारणी करत आहेत. दुसरीकडे निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. फसवणूक, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, वेश्याव्यवसाय अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्यांनाही उमेदवारी दिली आहे. काही उमेदवार विविध गुन्ह्यात तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये गुंडच नाही, तर गुंडांचे म्होरकेसुद्धा आहेत. उमेदवारी दिलेल्यांमध्ये मोक्कांतर्गत कारवाई झालेले, तडिपारीच्या यादीतील गुन्हेगारही आहेत. चिखली परिसरात वेश्याव्यवसाय आणि अवैध व्यवसायात गुंतलेल्याला प्रमुख राजकीय पक्षाने उमेदवारी दिली आहे. बांधकाम व्यावसायिक म्हणवून घेणाऱ्या परंतु लोकांची फसवणूक करत असलेल्यांना, मद्यविक्री व्यवसायात जम बसविलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रमुख पक्षांनीच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असल्याने नागरिकांपुढे अडचण निर्माण झाली आहे. एका उमेदवाराविरुद्ध दुसरा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार असा पर्याय मतदारांपुढे आहे. ज्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्यातरी एका पक्षातील गुंडाला निवडून देणे अथवा ‘नोटा’चा (वरील पैकी कोणीही नाही) पर्याय आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी, भाजपात सर्वाधिक गुंड?
By admin | Published: February 14, 2017 2:09 AM