लोणावळा : महाराष्ट्रातील आराध्य दैवत, कुलस्वामिनी कार्ला गडावरील श्री एकविरा देवीचा महानवमी होम पहाटे चार वाजता संपन्न झाला. पुणे जिल्ह्याचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते देवीचा पहाटेचा अभिषेक व आरती करत पहाटे चार वाजता धर्मदाय आयुक्त देशमुख, मंडल अधिकारी माणिक साबळे, गुरव प्रतिनिधी अरुण देशमुख व वेहेरगावचे पोलीस पाटील अनिल पडवळ या चार दांम्प्त्यांच्या हस्ते होमाला आहुती समर्पित करण्यात आली.
अष्टमीची रात्र व महानवमीच्या पहाटे एकविरा देवीच्या गडावर दर्शनाकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी प्रथमच प्रशासकीय समितीच्या देखरेखेखाली देवीचा नवरात्रौ उत्सव संपन्न झाला. गडावरील कायदा व व्यवस्था चोख ठेवण्याकरिता पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी बंदोबस्त तैनात ठेवला होता तर मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांनी यात्रेचे योग्य नियोजन केले होते. नवरात्रीच्या नऊही दिवस गडावर दर्शनाकरिता भाविकांची गर्दी पहायला मिळाली. लाखों भाविकांनी यात्रा काळात देवीचे दर्शन घेतले. अतिशय शांततामय वातावरणात देवीचा नवरात्र उत्सव गडावर संपन्न झाला.