वडगाव मावळ : नवलाख उंब्रे ते करंजविहिरे रस्त्याला मोजता येणार नाही एवढे खड्डे पडले असून, या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. रस्ता आहे की भातशेती हेच कळत नाही. येत्या आठ दिवसांत दुरुस्ती न केल्यास बांधकाम खात्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सरपंच दतात्रय पडवळ व ग्रामस्थांनी दिला आहे.
नवलाख उंब्रे, बधलवाडी, मिंडेवाडी ते करंजविहिरे या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. तीन ते चार फुटांचे मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात झाले आहेत.आंदरमावळातील 50 गावचे नागरिक जवळचा रस्ता म्हणून खेडला(राजगुरूनगर) जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. परंतु संपूर्ण रस्ता उखडल्याने त्यांना लांब अंतर पार करून दुसरीकडून जावे लागते. शालेय विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक, कामगार व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची आठ दिवसांत दुरुस्ती न केल्यास बांधकाम खात्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सरपंच दतात्रय पडवळ, भाऊसाहेब ढोरे, आबाजी बधाले आदींंनी दिला आहे.