पिंपरी : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी- माजी नगरसेवक, पदाधिकारी असे ४० हून अधिक कार्यकर्ते महापालिकानिवडणुकीत भाजपाच्या लाटेवर स्वार झाले. त्यांच्या मदतीने भाजपाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत बहुमताने सत्ता काबीज केली. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ज्यांचा वेगळाच थाट आणि सन्मान पक्षात होता, त्यांची भाजपातील शिस्तीमुळे केविलवानी अवस्था झाल्याचे बुधवारी दिसून आले.भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक बुधवारी झाली. त्यावेळी भाजपा पदाधिका-यांसह अनेक नगरसेवक बैठकीला आले होते. परंतु, भाजपातील पक्षशिस्तीनुसार केवळ पदाधिका-यांना बैठकीत बसण्यास परवानगी देण्यात आली. उर्वरित पदाधिका-यांना बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सलग तीन ते चार वेळा नगरसेवक पद भूषविलेले, महापालिकेत महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष अशी महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या पदाधिकाऱ्यांना आता भाजपाच्या संस्कृतीत वेगळीच वागणूक मिळत असल्याची जाणवू लागले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीतील नेते अजित पवार यांच्यापुढे मागे करणारे व बाजुच्या खुर्चीवर हक्काने बसणा-या कार्यकर्त्यांना शिस्त पचविणे अडचणीचे जात आहे. प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आल्यानंतर त्यांच्या बैठक कक्षापासून दूर अंतरावर थांबण्याच्या सूचना या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. सलग दीड ते दोन तास बैठक कक्षाच्या बाहेर त्यांना तिष्ठत थांबवे लागले. जाते, असे कधी यापूर्वीच्या पक्षात अनुभवास आले नव्हते. पक्षाचे सर्वेसर्वा नेत्यांच्या मोटारीत शेजारच्या आसनावर बसत असत. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांची घुसमट
By admin | Published: April 27, 2017 4:54 AM