पिंपरी : उमेदवारीअर्ज सादर करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला होता. उमेदवारीसाठी अनेक विद्यमान नगरसेवकांनी पक्षांतर केले. बंडखोराचा सर्वाधिक त्रास भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावा लागणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका सुजाता पालांडे यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी संत तुकारामनगर-कासारवाडी प्रभागातून भाजपाकडून अर्ज दाखल केला आहे. नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. पालांडे आणि जितेंद्र ननावरे यांची पत्नी प्रियंका या संत तुकारामनगर प्रभागातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, माजी महापौर योगेश बहल यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. राष्ट्रवादीकडून डावलले जाणार असल्याचे समजल्यानंतर पालांडे व ननावरे यांनी गुरुवारी राजीनामा दिला होता. त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रियंका ननावरे यांना अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव जागेवर आणि पालांडे यांनाही उमेदवारी दिली आहे. उमेदवारांची पळवापळवीराष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बंडखोरी होऊ नये, याची दक्षता राजकीय पक्षांनी घेतली आहे. प्रत्येकजण दुसरा पक्ष कधी उमेदवार जाहीर करतो. आणि त्या विरोधात आपला कसा उमेदवार देता येईल, अशी व्यूहरचना सर्वांनी आखली होती. उमेदवारांची पळवापळवी करण्याचे नियोजन नेत्यांनी केले होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीने विद्यमानांचे पत्ते कापल्याने पक्षांतर
By admin | Published: February 04, 2017 4:03 AM