पिंपरी : शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाजपाविरोधातील हल्लाबोल आंदोलन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. आकुर्डीगावठाण ते तहसिल कार्यालयापर्यंत काढलेल्या रॅलीत मोटार पुढे नेण्यावरून माजी आमदार बण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळुराम पवार यांच्यात धुसपूस झाली होती. रॅली संपल्यानंतर चिंचवडगाव येथे गेल्यानंतर माजी नगरगसेवक पवार आणि माजी आमदार बनसोडे यांच्यात हमरी तुमरी झाली. माजी आमदार बनसोडे यांच्या मोटारीचे दगड मारल्याने नुकसान झाले. माजी उपमुख्यमंत्री शहरात असतानाच हा प्रकार घडल्याने प्रकरण मिटविण्याचे उशीरापर्यंत सुरू होते.
भाजपा सरकार शेतक-यांना कर्ज माफी देऊ शकले नाही. महागाई वाढली. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे नागरिक त्रस्त झाले. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा प्रश्न, शास्ती माफी ही केवळ आश्वासनेच ठरली. भाजपा सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले. याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाला वादाचे गालबोट लागले. चिंचवडगाव पोलीस ठाण्यात माजी आमदार बनसोडे आणि माजी नगरसेवक पवार यांनी परस्परविरोधी तक्रारी देण्यासाठी धाव घेतली. मात्र राराष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्याकडून तक्रार न देण्याबद्दल दोघांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. ८ वाजेपर्यंत कोणाचीही तक्रार पोलिसांकडे दाखल झाली नव्हती