पिंपरी : महापालिकेच्या विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. विरोधी पक्षनेते बदलाच्या हालचाली सुरू आहेत. विद्यमान विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याबाबत राष्ट्रवादीमध्ये उत्सुकता आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर यांच्या नावाची चर्चा आहे.
महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता असून विरोधी पक्षनेते पद दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे ७७ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक, शिवसेनेचे ९, मनसेचे एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाकडे सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षी विरोधी पक्षनेतेपदी माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर दुसºया वर्षी दत्ता साने यांना आणि तिसऱ्या वर्षी नाना काटे यांना संधी मिळाली होती. काटे यांचा कालावधी या महिनाअखेरीस पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन विरोधी पक्ष नेता कोण होणार, याबाबत पालिकेच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे.भाजपाची सत्ता आल्यानंतर महापालिकेत राष्ट्रवादीने हल्लाबोल करणे अपेक्षित होते. मात्र, प्रखर विरोध होताना दिसत नाही. राष्ट्रवादीतही गट-तट आहेत. एक गट भोसरीच्या भाजपाच्या आमदारांच्या विरोधात बोलत नाही, तर दुसरा गट चिंचवडच्या आमदारांच्या विरोधात भूमिका घेत नाही. तर विरोधी पक्षातील काही नगरसेवक व भाजपा नेत्यांची ठेकेदारीमध्ये एकत्र भागीदारी आहे. त्यामुळे विरोध हा नावपुरताच दिसून येत आहे. दत्ता साने यांनी हल्लाबोल सुरू करतानाच त्याचा कालावधी संपला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटा-तटांचा फटका त्यांना बसला होता. आता चौथ्या वर्षांसाठी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले.........................विरोधी पक्षनेता बोलणारा हवानवीन विरोधी पक्षनेता हा अभ्यासू आणि बोलणारा असावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीकडून प्रखर विरोध होणे अपेक्षित होते. मात्र, तो काही प्रमाणात दत्ता साने यांचा अपवाद वगळता आजपर्यंत झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे नवीन विरोधी पक्षनेता निवडताना जुन्या पदाधिका-यांना संधी द्यायची की युवा नगरसेवकांना द्यायची, याबाबत पक्षनेतृत्वाचा कस लागणार आहे.