नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पंधरा वर्षे सत्तेत होती. मात्र त्यांच्याकडे व्हिजन नव्हतं. त्यांना पिंपरी- चिंचवड शहरात केवळ काँक्रिटचं जंगल उभं करायचं होतं. मात्र, आता शहरासह पुणे जिल्ह्यात पीएमआरडीएच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास करण्यात येत आहे. पिंपरी -चिंचवड शहरासाठी दोन महिन्यांत आंद्रा धरणातून २५० एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहराची पाण्याची समस्या सुटेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पिंपळे सौदागर येथे गुरुवारी रात्री झालेल्या नागरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवडच्या ट्रॅफिकच्या समस्येवर एक अतिशय प्रभावी उपाय हा आपण करतोय. पीएमआरडीएच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास करतोय. सांडपाण्यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. पुण्यासाठी एक नवीन विमानतळ देखील तयार करण्यात येत आहे. कारण पुणे जिल्ह्यात परदेशी कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. २५ देशांतले एअरलाइन्स पुणे विमानतळावर स्लॉट द्या म्हणतात पण आपल्या स्वतःला स्लॉट उरलेला नाही. नवीन विमानतळामुळे ही समस्या सुटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १५ वर्षे सत्तेत होती. पण या वाढत्या शहराच्या मॅनेजमेंट करता त्यांना एक काम दाखवता येत नाही. कारण कुठलं व्हिजन त्यांच्याकडे नव्हतं. त्यांना केवळ काँक्रिटचं जंगल उभं करायचं होतं.
तर चिंचवडमध्ये लोडशेडींग असते..
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत आहे. येथील वाढते नागरीकरण लक्षात घेऊन विजेची समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प करण्यात येत आहे. त्यासाठी चौदाशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा व चिंचवड परिसरातील वीज समस्या सुटली आहे. हा निधी दिला नसता तर चिंचवड मध्ये लोड शेडिंग झाले असते, असे बावनकुळे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"