पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ सभापती आणि उपसभापती निवडणुकीत भाजपाच्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांना संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गडावर भाजपा प्रवेशाची ही नांदी मानली जात आहे. यातून राष्ट्रवादी आणि भाजपाची छुपी युती असल्याचे दिसून येते. सर्वांनाच संधी मिळावी, म्हणून उर्वरित सदस्यांनी सहा-सहा महिने कालावधीचा फॉर्म्युला अवलंबून ‘सत्तेसाठी काहीही’ याचे उत्तम उदाहरण आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानला जातो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर पवारांनी महापालिकेत जातीने लक्ष घातले होते. याचे चित्र स्थायी समिती सभापती, सदस्य, प्रभागाध्यक्ष निवडीत दिसून आले. शिक्षण मंडळाची निवडणूक मागील आठवड्यात झाली. त्यात आमदार जगताप गटाला झुकते माप देण्यात आले. त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीच्या छुप्या युतीबद्दल आणि जगताप यांच्यापुढे पवार झुकले, अशी जोरदार चर्चाही शहरात रंगू लागली आहे. सभापतिपदासाठी राष्ट्रवादीतील शिरीष जाधव, निवृत्ती शिंदे, चेतन भुजबळ, महिला म्हणून सविता खुळे, चेतन भुजबळ हेही तीव्र इच्छुक होते. गतवेळी माजी आमदार विलास लांडे समर्थकांना संधी दिल्याने, या वेळी आमदार जगताप समर्थकांना संधी देण्याचा समझोता करण्यात आला. त्यामुळे जाधव आणि शिंदे यांचा पत्ता कट केला. जगताप गटातील घुले आणि शिवले यांना संधी दिल्याने भुजबळ, खुळे यांचा पत्ता या वेळी कट करण्यात आला.सहा महिन्यांपूर्वी शिक्षण मंडळातील आठ जणांनी दोन पदांसाठी सहा महिने प्रत्येकास हा फॉर्म्युला अवलंबिण्याचे ठरविले. त्यानुसार धनंजय भालेकर, श्याम आगरवाल यांना यापूर्वी, तर घुले व शिवले यांना पुढील सहा महिन्यांसाठी संधी मिळाली आहे. आपल्या नावापुढे पद लागावे, या लालसेपोटी सदस्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या दृष्टीने तो भूषणावह असला, तरी ही बाब चांगली नाही. स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी पदाची पत, प्रतिष्ठा कमी होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. शिक्षण मंडळाची प्रतिष्ठा राखण्याची गरज सभापतिपदी घुले आणि शिवले यांना संधी मिळाली आहे. घुले हे उत्तम संघटक आहेत. क्रीडापटू आहेत. तळागाळातील कार्यकर्ता आहे, तर शिवले उच्चविद्याविभूषित, शिक्षक, उत्तम वक्ते, लेखक, निवेदक आहेत. शिक्षण आणि शिक्षकाविषयी जाण आणि भान त्यांना आहे. शिक्षण मंडळाची प्रतिष्ठा कायम राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच यापूर्वी न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले शालेय साहित्यवाटप, शिक्षकांना अध्यापनात येणाऱ्या अडचणी, शाळांतील शिक्षणाचा दर्जा वाढविणे यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावेत. पावसाळा संपत आला. हिवाळा सुरू होईल. आता तरी शालेय साहित्याचे वाटप व्हावे, ही अपेक्षा आहे.- विश्वास मोरे
राष्ट्रवादीची भाजपाशी युती उघड
By admin | Published: October 12, 2015 1:03 AM