पिंपरी : माजी महापौर आझम पानसरे राष्ट्रवादी काँगे्रसमधून भाजपामध्ये गेल्याने शहरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. यामुळे शहरातील राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली असून आता पक्षाची धुरा माजी आमदार विलास लांडे व अण्णा बनसोडे यांच्यावर आली असल्याचे बोलले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसने एकहाती सत्ता काबीज केली. या सत्तासमीकरणात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, चिंचवडचे माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर आझम पानसरे, विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, योगेश बहल, मंगला कदम आदींचे योगदान होते. मात्र, आता एकेकाळी राष्ट्रवादीतून आपल्या समर्थकांना नगरसेवक बनवून आपली ताकद दाखविणारे शहरातील राष्ट्रवादीचे नेते भाजपात डेरेदाखल होत आहेत. यामुळे शहरात राष्ट्रवादी काँगे्रसला खिंडार पडत आहे. राष्ट्रवादीच्या सत्ताकारणात लांडे, जगताप, पानसरे यांची एक ताकद मानली जायची. यासह माजी आमदार बनसोडे, बहल, संजोग वाघेरे यांचेही प्राबल्य आहे. आता जगताप, पानसरे यांनी पक्षांतर केल्याने लांडे व बनसोडे यांच्यावर जबाबदारी आल्याचे बोलले जात आहे. पानसरे यांना राष्ट्रवादीचे शहरातील नेतृत्व मानले जात होते. त्यांचे समर्थकही अधिक आहेत. पानसरे आणि राष्ट्रवादीला मानणारा एक वर्ग आहे. आता हा वर्ग पानसरेंच्या मागे जातो की राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहतो, याकडे लक्ष लागले आहे.
लांडे, बनसोडे यांच्यावर राष्ट्रवादीची धुरा
By admin | Published: January 10, 2017 3:20 AM