लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : काळभोरनगर येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद रमजान शेख यांना तामिळनाडू प्रीमिअर लीग क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी अटक केली. चिखली येथील साने बिल्डींगमध्ये हा सट्टा खेळला जात होता. मंगळवारी रात्री निगडी पोलिसांनी छापा टाकून नगरसेवक शेख यांच्यासह पाच आरोपींना अटक केली. तसेच न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. यामध्ये आरोपींकडून २ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कारवाई झालेल्या आरोपींमध्ये जावेद रमजान शेख (वय ४७, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी), नवीन भगवान मित्तल (वय ४३, रा. मित्तल बिल्डींग, चिखली), राकेश नेमिचंद मेहता (वय ३७, रा. बालाजीनगर धनकवडी), प्रवीण शिवाजी पवार (वय ३६, रा. दत्तवाडी आकुर्डी), जाकीर मस्तान शेख (वय २९, रा. विद्यानगर चिंचवड) यांचा समावेश आहे.चिखलीच्या मित्तल बिल्डींगमधील एका सदनिकेत सट्टा लावण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी मंगळवारी त्या ठिकाणी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, लॅपटॉप, मोबाईल, रोख ५३ हजार ५०० रुपये असा एकूण २ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाचही जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.
‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक जावेद शेख यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 3:03 AM