पिंपरी महापालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा; प्रवेशद्वारासमोर आणला चक्क 'नंदीबैल'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 05:20 PM2021-08-25T17:20:50+5:302021-08-25T17:21:01+5:30
''भाजपच्या बैलाला पाच टक्के पाहिजे, भाजपच्या बैलाला शहर वाटून पाहिजे, नही चलेगी, नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी...'', अशा जोरदार घोषणा
पिंपरी : ''भाजपच्या बैलाला पाच टक्के पाहिजे, भाजपच्या बैलाला शहर वाटून पाहिजे, नही चलेगी, नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी...'', अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात महापालिकेवर मोर्चा काढला. पोलिसांनी प्रवेशव्दारावर अडवल्याने ठिय्या मांडून भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ जागरण गोंधळ घातला.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करून मोरवाडी चौक मार्गे महापालिकेवर हा मोर्चा काढला. पोलिस आणि महापालिका सुरक्षारक्षकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा प्रवेशव्दारावर अडवला. पोतदार, नंदीबैल, वासुदेव, गोंधळी यांच्या आंदोलनातील सहभागाने जागरण गोंधळ घातले. भ्रष्टाचारी व टक्केवारीच्या कारभाराचा निषेध केला.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चात माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर शकुंतला धराडे, योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि अन्य सदस्य सहभागी झाले होते.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले, महापालिकेत भ्रष्टाचाराची सिमा गाठली आहे. आंदोलनात नंदीबैलानेच पालिकेत भाजपच्या लोकांना किती टक्के पाहिजे ? हे सांगितले. त्या पध्दतीनेच शहरात भाजपचे कारभारी काम करत आहेत. या प्रकारांना राष्ट्रवादी भीक घालणार नाही. स्थायी समिती आणि महापालिका बरखास्त करावी. श्रीमंत महापालिका, बेस्ट आणि स्मार्ट सिटीचा नावलौकिक राष्ट्रवादीने मिळवून दिला. पण, सत्ताधारी भाजपच्या कारभार आणि वागणुकीमुळे महापालिकेची राज्यात आणि देशात बदनामी झाली. शहराच्या नावलौकिकासाठी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमा.''
माजी आमदार विलास लांडे म्हणाले, भाजपचे शहरातील कारभारी चाटून पुसून खात आहेत. नागरिकांना भिती वाटू लागली आहे. परंतु, काळजी गरज करण्याची गरज नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. आपले नेते यांच्याकडे सर्व मिळून राजीनामे देऊन टाका आणि त्यांच्या चुकीच्या कामांची चौकशी करण्यासाठी ही महापालिका बरखास्त करावी.''