पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्ला येथील एकविरा देवी मंदिराचा आणि लेणीचा विकास करण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांची बारणे यांनी भेट घेतली. निधी देण्याबाबतचे निवेदन त्यांना दिले. कार्ला येथे ऐतिहासिक लेणी आहे. या लेणीजवळ एकविरा देवीचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या पौराणिक कथा महाभारतात देखील आढळतात. हे मंदिर पुरातत्व विभागाने संरक्षित केले आहे. या प्राचीन वास्तुमध्ये मागील काही वर्षांपासून कोणतेही विकास काम झाले नाही. एकविरा देवी आग्री समाजाचे आराध्य दैवत आहे. रायगड, मुंबई, कोकण आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक देवीच्या दर्शनासाठी व लेणी पाहण्यासाठी येतात. नवरात्रीच्या काळात एकविरा गडावर भाविक आणि पर्यटकांची रांग लागलेली असते. बारणे म्हणाले, ‘‘मंदिर आणि लेणीच्या विकासासाठी एकविरा गडावर जाणा-या पादचारी मार्गांचा विकास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय बांधणे आणि संरक्षण भिंत बांधण्यासाठी चार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा.’’