चिंचवड : यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रचंड कष्टाची आवश्यकता आहे़ त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी असणे गरजेचे आहे़ अंतिम ध्येय गाठल्यानंतरही ज्यांचे पाय जमिनीवर असतात़ अशांचा गौरव होतो़ त्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत काम करणे महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ़ प्ऱ चिं़ शेजवलकर यांनी व्यक्त केले़ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या भारतरत्न जे़ आऱ डी़ टाटा उद्योग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते़ अॉटो क्लस्टर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या वेळी कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून मनोहर पारळकर उपस्थित होते़ या प्रसंगी डायनामिक कंट्रोल भोसरीचे किशोर राऊत यांना भारतरत्न जे़ आऱ डी़ टाटा उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर उद्योजक एस़ जी़ शिरूरे यांना उद्योग विकासरत्न, दत्तात्रय कोठारे यांना कृषी उद्योग विभूषण, रवींद्र कल्याणकर, दयानंद कोटे यांना उद्योगभूषण आणि शोभा माने यांना उद्योगसखी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ डॉ़ शेजवलकर म्हणाले,‘‘ जगातील चांगली माणसे दुर्मिळ होत चालली आहेत़ मात्र आपण सुंदर जगाकडे जायला पाहिजे़ अमेरिका देशासारखी निवडणूक यंत्रणा राबविली पाहिजे, असे मत व्यक्त केले़ तसेच देशातील महिला अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहेत़ त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे़ देशातील साक्षरता वाढली पाहिजे़’’ पुरस्कारप्राप्त उद्योजकांनी संवाद साधला. पुरस्कारप्राप्त उद्योजकांच्या यशात परिवाराचा, कुटुंबाचा मोठा वाटा आहे़ सामाजिक बांधिलकी जपत काम करणारे उद्योजक देशाची शान वाढवितात, असे मत मनोहर पारळकर यांनी व्यक्त केले़ प्रा़ दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले़ संघटनेचे अध्यक्ष बथवेल बलीद, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, जयवंत भोसले, हनुमंत देशमुख, राजेंद्र वाघ उपस्थित होते़(वार्ताहर)
सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज
By admin | Published: November 09, 2016 2:41 AM