पिंपरी : शिक्षणामधील अडथळे जेवढे दूर कराल तेवढे शिक्षण मार्मिकपणे दूरवर पोहोचेल. ज्या मुलांना आई-वडिलांचा सहवास, मार्गदर्शन मिळाले नाही, अशा लाखो मुलांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. लहान मुलांना शिक्षणाचा हक्क मिळण्यापेक्षा खेळण्याचा हक्क मिळण्याची आज जास्त गरज आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावसकर यांनी व्यक्त केले. महिला दिनानिमित्त शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुवारी भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात ‘तेजस्विनी कार्यगौरव सन्मान’ गावसकर आणि ‘यशस्विनी कार्यगौरव सन्मान’ निवृत्त आयएएस अधिकारी लीना मेहेंदळे यांना महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. नरेंद्र गोएदानी, शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, सदस्य विजय लोखंडे, शिरीष जाधव, धनंजय भालेकर, सविता खुळे, श्याम आगरवाल, निवृत्ती शिंदे, चेतन भुजबळ, फझल शेख, लता ओव्हाळ, विष्णू नेवाळे, नगरसेविका स्वाती साने, शुभांगी बोऱ्हाडे, साधना जाधव, प्रभारी प्रशासन अधिकारी भाऊसाहेब कारेकर आदी उपस्थित होते. धराडे यांच्या हस्ते शिक्षण मंडळाचा व्हीजन २०१६-१७चा आराखडा प्रकाशित करण्यात आला. गावसकर म्हणाल्या, ‘‘मुलगाच हवा, या हव्यासापायी सामाजिक संतुलन बिघडले आहे. त्यातूनच खून, बलात्काराच्या घटना घडतात. मुलांना खेळायला-बागडायला दिले, तर पुढची पिढी गुन्हेगारी वा व्यसनाच्या आहारी जाणार नाही. खेळातून जय-पराजय शिकल्यावर मोठेपणी आत्महत्या करण्याची व व्यसनाच्या आहारी जाण्याची वेळ मुलांवर येणार नाही. (प्रतिनिधी)
खेळण्याच्या हक्काची गरज
By admin | Published: March 11, 2016 1:28 AM