पिंपरी : पन्नास टक्के रोजगार देणारे क्षेत्र कृषी क्षेत्र असून या क्षेत्रात संशोधन होणे गरजेचे आहे. शास्त्र शुद्धपद्धती आणि नाविन्यतेने शेती व्यवसाय ही काळाची गरज आहे, असे मत राज्याचे वन आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. पिंपरीतील एच. ए. मैदानावर आंतरराष्ट्रीय हॉर्टी प्रो २०१८ या प्रदर्शनाची सुरूवात आज झाली. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर वन विभागाचे सचिव विकास खार्गे, नर्सरी असोसिएशनचे संतोष शितोळे, विश्वास जोगदंड, सुरेश पिंपळे, नयन काझी, योगेश जेऊरकर, अभिषेक सिंग, अनिल आंबेकर, हेमंत कापसे, अमित पराशर आदी उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, कृषी आणि वन, वृक्षप्रेमाचे दाखले छत्रपती शिवरायांनी दिले आहेत. याच भूमीत आज हॉर्टीक्लचरचे प्रदर्शन होत आहे. ही बाब आनंददायी आहे. संशोधन हे केवळ विद्यापीठात होत नाही तर नर्सरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडूनही ते अधिक प्रभावीपणे होऊ शकते, अशी माझी धारणा आहे. कारण नर्सरीत प्रत्यक्षपणे काम करणारा व्यक्ती हा उत्तम निरीक्षणे नोंदवू शकतो. त्या निरीक्षणांचा उपयोग करून अभ्यास करायला हवा. आपल्याला मिळालेले ज्ञान वाटायला हवे. फ्लोरीकल्चर, नर्सरी, टिशू कल्चर या क्षेत्रात अधिक चांगले संशोधन होऊ शकते. वृक्ष लागवडीतून पुण्य मुनगंटीवार यांनी सांगितले, पूर्वी रक्तदान, नेत्रदान, अन्नदान यातून पुण्य मिळते. अशी धारणा होती. मात्र, देवाने आपला जीआर बदलला आहे. आता वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन जो करेल त्यालाच पुण्य मिळेल. वसुंधरेचे जतन करणे आपली जबाबदारी आहे. म्हणूनच सरकारने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. भविष्यात इंधनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. डिझेलमुक्त, पेट्रोलमुक्त आणि कोळसा मुक्त झाल्याशिवाय वसुंधरेचे रक्षण होणार नाही.विश्वास जोगदंड म्हणाले, नर्सरी आणि लँडस्केपींग, अशा क्षेत्राताील १२ देश आणि ३० राज्यातील सुमारे तीनशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पृथ्वीचे पर्यावरण रक्षण हा मंत्र घेतला आहे.
पन्नास टक्के रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्रात संशोधन गरजेचे : सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 4:14 PM
संशोधन हे केवळ विद्यापीठात होत नाही तर नर्सरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडूनही ते अधिक प्रभावीपणे होऊ शकते, अशी माझी धारणा आहे.
ठळक मुद्देपिंपरीतील एच. ए. मैदानावर आंतरराष्ट्रीय हॉर्टी प्रो २०१८ या प्रदर्शनाला सुरूवात डिझेलमुक्त, पेट्रोलमुक्त आणि कोळसा मुक्त झाल्याशिवाय वसुंधरेचे रक्षण होणार नाही.