लोणावळा : चारित्र्य संवर्धनाचे कार्य हे सांगून होणार नसून ते कृतीतून शिकवायला हवे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले यांनी व्यक्त केले. मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने आयोजित ‘२१व्या शतकातील नव्या पिढीच्या चारित्र्यसंवर्धनाचा सर्वांगिन विकासह्ण तीन दिवसीय शिक्षण परिषदेचा समारोप रविवारी ताकवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. यावेळी भारतीय जैन संघटना व शांतीलाल मुथा फाऊंडेशनचे प्रमुख शांतीलाल मुथा, मनशक्ती सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय कुवळेकर, मनशक्ती कृती समितीचे अध्यछ गजानन केळकर, संचालक प्रमोदभाई शिंदे व्यासपिठावर उपस्थित होते. परिषदेत महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमधून चारशे शिक्षक सहभागी झाले होते.शिक्षकांना मार्गदर्शन करताना डॉ. ताकवले म्हणाले, मन म्हणजे आत्मा आहे व आत्म्याचा विचार चांगला असला तर बुध्दी चांगली चालते. याकरिता चांगली बुध्दी, कृती व भावमार्ग मुलांना कसे देता येतील याचा विचार व्हायला हवा. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, सगळ्या जगांची माहिती एका क्षणात मुलांना उपलब्ध होत असताना त्यामधील काय घ्यायचे व काय सोडायचे हे कृतीतून समजून सांगायला हवे. याकरिता भावविश्व चांगले करुन ते मुलांना शिकवा. मुथा म्हणाले, जागतिक वातावरण आपण बदलू शकत नाही. तेव्हा त्या वातावरणाचा सामना करु शकतील अशी मुलं घडवा. समारोप सत्रांची प्रस्तावना प्रमोद शिंदे यांनी केली. डॉ. वर्षा तोडमल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
चारित्र्य संवर्धन कृतीतूनच शिकवण्याची आवश्यकता
By admin | Published: January 25, 2017 1:50 AM