पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणे, विजेचे खांब, पोस्टाच्या पेट्या व झाडे आदी ठिकाणी चिटकवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या जाहिरातींमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे दिसत आहे. तरीही प्रशासनाकडून अशा जाहिरातदारांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे. स्वच्छ भारत या अभियानांतर्गत शासकीय व निमशासकीय संस्था, विद्यालय व महाविद्यालयांमार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या संदर्भात शहरातील अनेक ठिकाणी जनजागृती मोहीम राबविल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे स्वच्छतेसाठी आटापिटा केला जात आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी चिटकवण्यात आलेल्या जाहिरातींमुळे शहर विद्रूप बनत चालले आहे. असा विरोधाभास दर्शवणारी परिस्थिती झाली आहे.जाहिरात मार्केटिंगचे महत्त्वाचे माध्यम आहे. परंतु, याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. जाहिरातींसाठी सार्वजनिक ठिकाणांचाही सर्रास उपयोग करतात. बस थांबा, पोस्टाच्या पेट्या, विजेचे खांब व भिंती यांच्यावर छोट्या-मोठ्या जाहिराती चिटकवल्या जातात. काही बस थांब्यावर बसच्या वेळापत्रकावरच जाहिराती लावल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)
शहर विद्रुपीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: January 25, 2017 1:50 AM