पिंपरी : बांधकामाच्या ठिकाणी खोदकामावेळी मातीची व दगडाची दरड पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. तसेच तीन कामगार जखमी झाले. निष्काळजीपणे मृत्यू घडवून आणल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला. ही घटना ११ जून रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास सिटीवन स्काॅयवी, किवळे येथे घडली.
संदीप कोलाय बनसिंग (वय २०, रा. कुडवा, जि. पश्चिमी सिंधभूम) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. रंगनाथ भोजगुड असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पोलीस हवालदार महादू विठ्ठल डामसे यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १४) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा माऊली कन्स्ट्रक्शन कंपनीचा माल आहे. त्याच्या कंपनीकडून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळ किवळे येथील सिटीवन स्काॅयवी येथे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी खोदकाम करताना खोली जास्त असल्याने स्टेपमध्ये खोदकाम करणे आवश्यक होते. तसे न करता सरळ रेषेत खोदकाम केले. तसेच यावेळी कोणत्याही प्रकारे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केली नाही. कामगारांना पुटींगचे काम करण्यास भाग पाडले. कामगार काम करीत असताना मातीची व दगडाची दरड पडली. त्यात कामगार दरडीखाली गाडले गेले. यात संदीप बनसिंग याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. तसेच तीन कामगार जखमी झाले, असे फिर्यादीत नमूद आहे.