देहूरोड : अशैक्षणिक कामांमुळे शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार शिक्षकांनी सहविचार सभेत केली. देहूरोड कॅन्टोन्मेंट लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांची सहविचार सभा आयोजित केली होती. त्या वेळी अनेक शिक्षकांनी आपली मते मांडली. बोर्डाच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष विशाल खंडेलवाल, प्रभारी कार्यालय अधीक्षक सुभाष मोरे, सर्व शिक्षा अभियानप्रमुख श्रीकांत पतके, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. शिस्तीला प्राधान्य द्यायला हवे. बोर्डाकडून भौतिक सुविधा पुरवण्यात येतील, सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. शिक्षकांनी शाळांचा दर्जा, पटसंख्या वाढविण्यासाठी प्राधान्य द्यावे. शिक्षकांनी शाळेच्या वेळेत मोबाइल वापरू नयेत, असे आवाहन खंडेलवाल यांनी केले. ते म्हणाले, ‘‘शिक्षकांनी स्वत:ची मानसिकता बदलली पाहिजे. शिक्षकांनी पटसंख्या घसरण्याची कारणे व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी लेखी सूचना द्याव्यात. प्रशासन योग्य निर्णय तातडीने घेईल. शिक्षकांनी सूक्ष्म नियोजन करण्यास प्राधान्य द्यायला हवे.’’मुख्याध्यापिका पी. एम. शिंदे, जे. बी. शिंगाडे, सिकंदर मुलाणी आणि ज्ञानेश्वर तापकीर, एम. एफ. खान, सुनंदा भेगडे, वंदना गोटे, जयश्री चौधरी, कुंडलिक दाभाडे आदी शिक्षकांनी त्यांना दर वर्षी देण्यात येणाऱ्या बोर्डाच्या मतदार यादी आणि इतर अशैक्षणिक कामांकडे लक्ष वेधले. बीएलओ, शिक्षकांची कमतरता आदी कारणांनी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मुद्दे मांडले. अनेक शाळांत वर्गवार शिक्षक नाहीत. बोर्डाच्या शाळांना मैदाने नाहीत. प्रयोगशाळा साहित्य नाही. इंटरनेट सुविधा नाहीत. काही शाळांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अयोग्य आहे. वेळोवेळी होणाऱ्या बदल्यांचे धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली. पालकांचा बोर्डाच्या शाळांवर विश्वास राहिलेला नसल्याचे मत व्यक्त करून परिसरात इंग्रजी माध्यम शाळा झपाट्याने वाढत असल्याने त्याचाही पटसंख्येवर परिणाम होत असल्याचे नमूद केले. बोर्डाच्या शाळांतील चांगल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)
अशैक्षणिक कामांमुळे शाळांकडे दुर्लक्ष
By admin | Published: December 13, 2015 11:41 PM