पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या आरक्षणांची सोडत सात आॅक्टोबरला होणार आहे. सर्वच महापालिकांतील आरक्षण सोडतीबाबत एकसूत्रता राहावी, म्हणून निवडणूक आयोगाने प्रक्रियेत बदल केले आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत चक्रानुक्रमे फिरविताना रंगीत बॉलऐवजी चिठ्ठी वापरण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम २० आॅगस्टला जाहीर केला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून आदेश मिळताच रचना करून त्याचा आराखडा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिकेचे आयुक्त यांच्या समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता. समितीकडून १२ सप्टेंबरला हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला. हा आराखडा आयोगाकडून अंतिम होऊन २३ सप्टेंबरला महापालिकेच्या कस्टडीत येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवक संख्या १२८ कायम राहणार असून, प्रभागांची संख्या ३२ असणार आहे. ५० टक्के जागा महिलांसाठी आहेत. निवडणुकीसाठी प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करण्याची आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत नगरविकास विभागाने निश्चित केली आहे. लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार जागांचे आरक्षण ठरणार असून, अनुसूचित जातींसाठी २०, अनुसूचित जमातींसाठी ३, तर इतर मागासवर्गीयांसाठी ३५ जागा असतील, असा अंदाज आहे. काही ठिकाणी बॉल, तर काही ठिकाणी चिठ्ठीचा वापर केला होता. आरक्षणांची सोडतीसाठी चिठ्ठी रंगीत बॉलमध्ये टाकून ते बॉल चक़्रानुक्रमे फिरविण्यात आले होते. यात राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. सर्व महापालिकांसाठी एकच पद्धत अवलंबली जाणार आहे. चिंचवड येथील प्रा. मोरे प्रेक्षागृहात आरक्षणांची सोडत होणार आहे. ही सोडत आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या नियंत्रणाखाली होणार आहे. सोडतीची रंगीत तालीम चार दिवस अगोदर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सोडतीसाठी पारदर्शक ड्रम वापरण्यात येणार आहे. ड्रममध्ये टाकावयाच्या चिठ्ठीच्या कागदाचा आकार ए फोर साइजचा असावा. चिठ्ठी रोल करून त्यावर लावण्यात येणारे रबरबँड हे एकाच रंगाचे असावे. ते बँडही रोलच्या मध्यभागी लावलेले असावे. सोडतीच्या वेळी सर्व प्रभाग दर्शविणारा नकाशा, तसेच प्रत्येक प्रभागाच्या हद्दी दर्शविणारा नकाशा ठळकपणे दिसेल, अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रभागाच्या सीमा सोडतीच्या वेळी स्पष्ट कराव्यात. सोडत शालेय विद्यार्थ्यांच्या हातून काढण्यात यावी.(प्रतिनिधी)
सोडतीसाठी अवलंबणार नवी पद्धती
By admin | Published: September 23, 2016 2:10 AM