पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रीडा विभागातील प्रश्नांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशी बैठक झाली. त्यात लवकरच क्रीडा धोरण तयार केले जाणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर खेळाडूंची मदत घेऊन क्रीडा क्षेत्रात महापालिकेचा लौकिक वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. खेळाडूंच्या सूचनांचा अंतर्भाव धोरणात केला जाणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कला आणि क्रीडा विभाग निर्माण केला आहे. या विभागावर मोठ्याप्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. मात्र, निधीच्या तुलनेत राष्टÑीय किंवा आंतरराष्टÑीय पातळीवर खेळाडू चमकलेले नाहीत. त्यामुळे क्रीडा विभाग आणि धोरणात बदल करण्याचे नियोजन भाजपाने सुरू केले आहे.आयुक्तांच्या दालनात अधिकारी आणि क्रीडा विभागाचे पदाधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत क्रीडा विभागाच्या कामकाजांचा आढावा घेण्यात आला. क्रीडा विभागाचे उपक्रम, त्याची फलनिष्पत्ती यावर चर्चा झाली. तसेच तरण तलाव आणि खेळाची मैदाने, व्यायामशाळा यांची सद्य:स्थिती यावरही चर्चा झाली. त्यावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यावरही सविस्तर चर्चा झाली. त्या वेळी क्रीडा धोरणात बदल करण्याचे निश्चित करण्यात आले.>तरण तलावावरसाडेचार कोटी खर्चसत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शहरातील विविध भागांत महापालिकेचे १२ तरण तलाव असून त्यावर वर्षाला साडेचार कोटी रुपये खर्च होत आहे. मोठ्याप्रमाणावर तरण तलाव असतानाही अमोल आढाव सारखे आंतरराष्टÑीय दर्जाचे स्विमर तयार झालेले नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. या साठी क्रीडा धोरणात काही बदल करणे अपेक्षित आहे. चांगल्या संस्था आणि खेळाडूंना एकत्र करण्याची गरज आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन चांगले खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’’>धोरणात होणारमान्यवरांचा समावेशहॉकी, टेनिस, लॉन टेनिस, जलतरण पटू, कुस्ती, नेमबाजी, अॅथलेटीक्स, बॅडमिंटन आदी विविध खेळांचे मान्यवर खेळाडू या शहरात आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यात येणार आहे. नामवंत खेळाडूंच्या सूचनांचा अंतर्भाव नवीन धोरणात करण्यात येणार आहे.
महापालिकेतर्फे नवे क्रीडा धोरण, खेळाडूंच्या सूचनांचा अंतर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:48 AM