ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. ४ : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे नव्या ह्यएसटीह्णचा प्रवास आरामदायी होण्यासह अधिकाधिक सुरक्षीत होईल,यावर भर देण्यात येत आहे. जुन्या 'एसटी'मध्ये एकच संकटकालीन दरवाजा आहे. मात्र आता नव्या बसगाड्यांमध्ये एक ऐवजी दोन संकटकालीन दरवाजे बसविण्यात येत आहेत. त्यामुळे एखाद्यी आपत्कालीन परिस्थितीत उद््भवल्यास प्रवाशांना वेळीच बाहेर पडण्यास मदत होईल.
मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी अतिवृष्टीने कोसळला. नदीच्या प्रवासात दोन एसटी बससह अनेक वाहने वाहून गेली. या दोन 'एसटी'मध्ये चालक-वाहकांसह एकूण २२ जण असल्याची माहिती उपलब्ध झाली. महाराष्ट्रात मोठ्या शहरापासून लहान, दुर्गभ भागात दररोज हजारो एसटी बसेस धावतात. सुरक्षित प्रवास म्हणून म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते. दुर्दैवाने अन्य कारणांमुळे बसगाड्यांचा अपघात होतो. वेळोवेळी होणाऱ्या घटना आणि त्रुटी लक्षात घेऊन एसटी अधिकाधिक आरामदायक आणि सुरक्षित बनविण्यात येत आहे.
जुन्या एसटी बसमध्ये चालकाच्या पाठीमागील भागात संकटकालीन दरवाजा आहे. केंद्र शासनाने लागू केलेल्या 'एआयएस-५२'(आॅटोमोबाईल इंडियन स्टँडर्ड-५२) या नियमानुसार आता 'एसटी'ची बांधणी केली जात आहे. या नव्या नियमानुसार बसची बांधणी करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे बसची बांधणी अधिक मजबूत होत आहे. या नियमामुळे नव्या बसगाड्यांमध्ये चालकांच्या मागच्या भागासह शेवटच्या आसनाजवळ संकटकालीन दरवाजा लावण्यात येत आहेत.
त्यामुळे नव्या बसगाड्यांमध्ये आता दोन संकटकालीन दरवाजे आहेत. एखादा अपघात झाल्यास या ठिकाणांहून प्रवाशांना बाहेर पडता येईल. शिवाय बसमध्ये प्रवेश करण्याचा दरवाजा आणि चालकाच्या दरवाज्यातून संकट काळात बाहेर पडता येऊ शकते,असे एस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.