पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार पिस्तूल हस्तगत केले. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
प्रमोद सोपान सांडभोर (वय ३३, रा. हरणेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे), शरद मुरलीधर साळवे (वय ३०, रा. काळेवाडी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. इतर तिघेजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे यांच्या खून प्रकरणानंतर तळेगाव दाभाडे परिसरात पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान, दरोडा विरोधी पथकाकडून गस्त सुरू असताना आरोपी त्यांच्या चारचाकी वाहनामधून तळेगाव दाभाडे बसस्थानक परिसरात संशयास्पद फिरत होते. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता चार पिस्तूल आणि काडतुसे मिळून आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी यांना अटक केली.
दरोडा विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख, पोलिस कर्मचारी आशिष बनकर, सुमित देवकर, गणेश सावंत, गणेश हिंगे, विनोद वीर, गणेश कोकणे, प्रवीण कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
मध्यप्रदेशातून आणले पिस्तूल
किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पिस्तूल मागवले. त्यासाठी तीन जण मध्यप्रदेशात जाऊन पिस्तूल घेऊन आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. यात आणखी तिघांचा समावेश असल्याचेही समोर आले.
खून प्रकरणात जामिनावर बाहेर
कोपरगाव येथील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या खून प्रकरणात शदर साळवे हा तुरुंगात होता. दोन-अडीच महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला. प्रमोद सांडभोर हा किशोर आवारे यांचा निकटवर्तीय असल्याचेही तपासातून समोर आले.
मावळात खळबळ
किशोर आवारे यांची १२ मे रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे हत्या करण्यात आली. त्यामुळे मावळ तालुका हादरला. त्यानंतर या हत्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पिस्तूल मागविल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे मावळ तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
कोण होते निशाण्यावर?
खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी कोणाला ‘टार्गेट’ करणार होते? त्यांच्या निशाण्यावर कोण होते? याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.