पिंपरी : योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या वाहनधारकांना दिलासा देण्यात आला आहे. या वाहनधारकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करता येणार आहे. शासनाने त्याबाबत अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार पिंपरी -चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुट्टीच्या दिवशी व कार्यालयीन कामकाजाच्या वेळी नुतणीकरणाचे काम केले जाणार आहे. तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन नोंदणीसाठी देखील शुक्रवारी (दि. १५) आरटीओचे कामकाज सुरू राहणार आहे.
योग्यता प्रमाणपत्राची वैधता संपलेल्या वाहनधारकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंट ज्यांना मिळालेल्या वाहनधारकांनी ऑक्टोबर २०२१ पर्यंत त्वरित नूतनीकरण करून घ्यायच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी सात ते १० या कालावधीत ही सुविधा मिळणार आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन वाहनासह उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी देखील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करता येणार आहे. या दिवशी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दिवशी अत्यावश्यक सेवेतील वाहने, स्कुलबस यांना प्राधान्य राहणार आहे.
दसऱ्याला सुरू राहणार ‘आरटीओ’चे कामकाजशासनाकडून दसऱ्याला सार्वजनिक सुटी जाहीर केली असली तरी देखील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटओ) कामकाज या दिवशी सुरू राहणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली जाते. अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून संबंधिताना त्यांच्या वाहनांचा ताबा मिळावा म्हणून शुक्रवारी (दि. १५) सुटीच्या दिवशीही पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू राहणार आहे. वाहन नोंदणी व करवसुलीचे कामकाज कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.