पिंपरी - काकडे पार्क, चिंचवडगाव येथील पवना नदीमध्ये जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. महाराष्ट्राची संपत्ती असलेल्या किल्ल्यांविषयी मुलांना माहिती व्हावी या उद्देशाने येथे खांदेरी किल्ला उभारण्यात आला आहे. भक्ती शक्ती प्रतिष्ठान व गडकिल्ले सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्रविक्रेते रघुराज एरंडे व ऋषीकेश परदेशी यांनी किल्ला उभारला आहे.खांदेरी किल्ला अलिबाग येथे १६७९ साली उभारण्यात आला. अलिबागपासून १० किमी अंतरावर समुद्रात हा किल्ला आहे. या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती पवना नदीतील बेटावर साकारण्यात आली आहे. किल्ल्यावर १८ बुरूज आहेत. दीपगृह व रडार यंत्रणा उभारण्यात आली आहे. काकडे पार्क येथील विसर्जन घाटावरून बोटीने प्रवास करून हा किल्ला पाहता येतो. किल्ल्याबाबत लहान मुलांना माहिती व्हावी यासाठी ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. खांदेरी किल्ल्यावर सौरऊर्जेमार्फत दिव्यांची सोय करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच पवना नदीतील किल्ल्यावरही सौरऊर्जेचे दिवे बसविले आहेत.दिवाळीच्या सुटीमध्ये किल्ला बनविणे ही गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. पुस्तकामध्ये अभ्यासलेला किल्ला प्रत्यक्षात आपल्या हाताने बनविताना मुले हरखून जातात.जलदुर्ग उभारण्यासाठी आम्हाला २० दिवसांचा कालावधी लागला. दिवसभर काम सांभाळून रात्री बारापर्यंत आम्ही काम करायचो. लहान मुलांना जलदुर्गांची माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही किल्ला उभारला आहे. येणाऱ्या नागरिकांमध्ये नदी प्रदूषणाविषयी जनजागृती केली जात आहे. - रघुराज एरंडे
वृत्तपत्रविक्रेत्याने उभारला पवना नदीत जलदुर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 1:40 AM