पिंपरी : 'मी गाढव आहे मला सांगितलेले कळत नाही, मी आदेश पाळत नाही कारण मी उच्चशिक्षित दीडशहाणा आहे, मी अतिशहाणा असून मॉर्निंग वॉकला चाललो आहे, मी स्वार्थी आहे कारण मी कोरोना फैलावण्यास मदत करत आहे, मला मास्क वापरायची गरज नाही कारण मी देशद्रोही आहे..' यांसारखे फलक निगडी पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या हातात देऊन काहीवेळ रस्त्यावर उभे करत कायमस्वरुपी लक्षात राहील अशाप्रकारची अनोखी शिक्षा दिली. पोलिसांनी मार्निंग वॉक करणाऱ्या दहा जणांवर शुक्रवारी (दि. १७) अशाप्रकारे कारवाई केली.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत आहे. त्यामुळे घरातच थांबण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. असे असतानाही या आवाहनाकडे दुर्लक्ष करून काही जण कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. सकाळी पोलीस अडवत नाहीत अथवा कोणी रोखणार नसल्याने पाय मोकळे करण्यासाठी अथवा कुत्रे फिरवण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडतात. शहरातील विविध भागात असे प्रकार सर्रास दिसून येतात. अशा नागरिकांना पोलिसांकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. पोलिसांची गस्त नसते, अशा रस्त्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे नागरिक घराबाहेर पडले. मात्र, त्याच वेळी गस्तीवरील पोलिसांनी त्यांना रोखले. मॉर्निंग वॉकसाठी ते घराबाहेर पडल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, त्यातील काहीजण कुत्रा फिरवण्यासाठी घराबाहेर पडले होते. मास्क न वापरता काही जण घराबाहेर पडल्याचे दिसून आले. याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मी आदेश पाळत नाही, कारण मी उच्चशिक्षित आहे. मी अतिशहाणा आहे, मॉर्निंग वॉकला चाललो होतो, असे फलक त्यांच्या हातात देण्यात आले होते.