पिंपरी :निगडी येथील भक्तीशक्ती पुतळ्याजवळ रविवारी (दि. २५) पहाटे एलपीजी गॅसचा टँकर उलटून अपघात झाला होता. याप्रकरणी निगडी पोलिसांनी टँकरचालकावर गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्रप्रसाद कुंजलराम यादव (५२, रा. उत्तर प्रदेश) असे टँकरचालकाचे नाव असून, सध्या जखमी असल्याने त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
राजेंद्र प्रसाद यादव हा त्याच्या ताब्यातील एलपीजी गॅसने भरलेला टँकर (क्र. एमएच ०४ जेके २३३७) घेऊन मुंबईकडून सोलापूरकडे जात होता. यावेळी त्याने वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता भरधाव वेगाने टँकर चालवल्याने तो भर रस्त्यावर उलटला. यावेळी पोलिस, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच भारत पेट्रोलियम यांच्या टीमने तब्बल १४ तास मेहनत करत पलटी झालेल्या टँकरमधून एलपीजी गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरला.
यंत्रणेने वेळीच दक्षता घेतल्याने पिंपरी चिंचवड शहरातील मोठा धोका टळला. मात्र, याची जाणीव असतानाही चालकाने वाहतुकीचे नियम मोडत भरधाव वेगाने टँकर चालवून अपघात केल्याप्रकरणी त्याच्यावर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.