पिंपरी : शहरी दाट वस्तीत अठरा टनांच्या गॅस टँकरला अपघात झाल्यानंतर त्यामधून गळती रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांसह पिंपरी अग्निशमन दलाचे ३, प्राधिकरणाचा १, चिखली १, थेरगाव दलाचा एक असे सहा बंब आणि चार क्रेनची कमाल त्यातून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले. काय घडलं, कस घडलं याची परिसरात चर्चा होती.
गळती रोखण्यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीचे पथक येईपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी टँकरवर अधूनमधून पाण्याचा मारा सुरू ठेवला होता. तर पोलिसांनी टिळक चौक आणि भक्तीशक्ती चौकातून महामार्गावरील वाहतूक वळविली होती. तर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे अपघातापासून अर्ध्या किलोमीटरचा परिसर वाहतुकीसाठी बंद केला होता. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दक्षतेचा भाग म्हणून परिसरातील वीज खंडित केली होती. येथे येणारा प्रत्येक माणूस काय झाले, कसे झाले असे विचारत होता. तर या भागातील सर्व दुकाने, घरे, व्यापारी संकुले रविवार असतानाही बंद ठेवण्यात आली होती.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ४ टीम घटनास्थळी होत्या. तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, अग्निशमन अधिकारी श्री. चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल यांनी घटनास्थळाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर घटनास्थळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे पाटील, सहायक आयुक्त रविकिरण घोडके, मनसेचे गटनेते सचिन चिखले, पोलिस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे हेही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आढावा घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. सहा बंब आणि चार क्रेनच्या कमालीने टँकरचा अपघात टळला.