पिंपरी :निगडी येथील भक्तीशक्ती चौक ते पवळे उड्डाणपूल दरम्यान गॅस टँकरला अपघात झाला. यात टँकरमधून गॅस गळती झाली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक वळवली. तसेच विविध विभागांना माहिती देऊन उपाययोजना करून रस्त्यावरून अपघातग्रस्त टँकर हटविला. प्रसंगावधान राखत वेळीच खबरदारी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. १६ तासांनंतर वाहतूक पूर्ववत झाली.
पिंपरी-चिंचवड शहराचे उत्तरेकडील प्रवेशव्दार असलेल्या मुंबई-पुणे महामार्गावर निगडी येथे रविवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास टँकरचा अपघात झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलिस आयुक्त सतीश कसबे, बाळासाहेब कोपनर, पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, विजया कारंडे, अजय जोगदंड, देवेंद्र चव्हाण, तेजस्विनी कदम यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भक्तीशक्ती चौक आणि निगडी येथील लोकमान्य टिळक चौक येथून वाहतूक वळविण्यात आली. भक्तीशक्ती चौकातून पुण्याकडे जाणारी वाहतूक त्रिवेणीनगर मार्गे वळवली. तर खंडोबामाळ चौक, आकुर्डी येथून निगडीकडे जाणाऱ्या वाहनांना पवळे उड्डाणपूलावर प्रवेश बंद केला. पवळे उड्डाणपुलाखालील लोकमान्य टिळक चौकातून ही वाहतूक भेळ चौकमार्गे बिजलीनगरकडे वळविली.
चार पोलिस ठाण्यांची कुमक
अपघातस्थळी गर्दी होऊ नये यासाठी निगडी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. चिंचवड, चिखली, देहूरोड आणि पिंपरी या पाेलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांसह वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी अशा ८० पोलिसांचा ताफा तैनात होता. भक्तीशक्ती चौक व लोकमान्य टिळक चौकासह ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून पोलिसांनी वाहतूक नियमन केले.
वाहनचालकांची कसरत
सुटीचा दिवस असल्याने शहरातील अनेक जणांकडून पर्यटनासाठी मावळ परिसरात जाण्याचे नियोजन होते. मात्र, अचानक टँकर अपघात होऊन वाहतूक वळविली. यात काही ठिकाणी वाहनांचा खोळंबा होऊन चालकांना कसरत करावी लागली. ‘संडे मूड’मध्ये असताना पर्यायी मार्गाने जावे लागल्याने अनेक वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली.
टँकरचालक जखमी
मुंबईकडून पुण्याकडे जात असताना टँकरला भक्तीशक्ती चौकातील पूलाच्या उताराजवळ अपघात झाला. यात टँकरचालक जखमी झाला. त्याला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. निगडी पोलिसांकडे अपघात प्रकरणी नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
टँकरमधून गॅस गळती होत असल्याने लागलीच वाहतूक वळविली. संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधला. गॅस रिफिलिंग करून अपघातग्रस्त टँकर हटविला.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त