पिंपरी : शहरातील सांस्कृतिक वारसा जपणे, त्याचे संवर्धन करणे, तसेच नागरिकांच्या मनोरंजनासाठी सुविधा पुरविण्याचे कामही मनपामार्फत केले जाते. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. शहरामध्ये चिंचवड, संत तुकारामनगर व भोसरी येथे नाट्यगृहे बांधण्यात आलेली आहेत. पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरामधील नागरिकांना त्यांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी भोसरी किंवा चिंचवडपर्यंत जावे लागत असल्याने ही गरज ओळखून स्थानिक आमदार व स्थानिक नगरसदस्य नियोजन व पाठपुराव्यामुळे पिंपळे गुरव येथील आरक्षण क्र. ३४५ च्या सुमारे ३५०२ चौ.मी. क्षेत्रावर भव्य असे नाटयगृहाचे काम चालू करणेत आलेले आहे. सद्यस्थितीत काम ९० टक्के पुर्ण झालेले असून विद्युत विषयक व साऊंड सिस्टिमचे काम बाकी आहे. नाटयगृहाची एकूण आसन क्षमता बाल्कनीसह ६१३ इतकी असून दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी तळमजल्यावर पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय पहिल्या मजल्यावर २१० चौ.मी. क्षेत्राचे बहुउद्देशीय सभागृह बांधणेत आलेले आहे. सभागृहाची आसन क्षमता ३०० इतकी आहे. सभागृहासाठी स्वतंत्र जीना असून सदरचे सभागृह लहान प्रमाणातील कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. नाट्यगृहाचे दर्शनी बाजूचा विचारपूर्वक नियोजन करून जीआरसी या संकल्पनेचा वापर करून साकारवयाचे काम चालू आहे. नाट्यगृहाच्या कामाची पाहणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली. तसेच काही सूचना केल्या. या वेळी बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
निळू फुले नाट्यगृहाचा पडदा उघडणार लवकरच
By admin | Published: April 24, 2017 4:42 AM