पिंपळे गुरव : येथील संत तुकाराममहाराज पूल (बास्केट पूल) या ठिकाणी महापालिकेच्या वतीने निर्माल्य टाकण्यासाठी मागील वर्षी दुतर्फा ठेवण्यात आलेले निर्माल्यकलश काही दिवसांपासून गायब झालेले आहेत. केवळ त्यांचा सांगडा व निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकावे असा फलक पुलावर शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुलावर निर्माल्य साचून राहत असून, हे कलश पूर्ववत बसवावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.डांगे चौक आणि रावेत यांना जोडणाऱ्या आगळ्यावेगळ्या पुलाची निर्मिती महापालिकेकडून करून परिसरातील सौंदर्यात भर घातली. हा पूल म्हणजे येथील पर्यटनस्थळ बनले असून, दररोज शेकडो नागरिक फेरफटका मारण्यासाठी या ठिकाणी येत असतात. पुलाचे सौंदर्य व नदीचे पावित्र्य राहावे, यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूस आकर्षक असे दोन निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून निर्माल्यकलश गायब झाल्यामुळे नागरिक नदी पात्रात व पुलावर कोठेही निर्माल्य टाकून नदी पात्र दूषित करीत आहेत. परंतु वर्षभरात हे ब्रीद नाहीसे झाल्यामुळे नागरिक कलशाअभावी निर्माल्य नदीपात्रात टाकत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रावेतचा पूल हा ग्रामस्थांसाठी आणि पर्यटकांसाठी भूषणावह आहे. या पुलामुळे रावेतच्या सौंदर्यात भर पडली आहे. परंतु, निर्माल्यकलश नसल्याने नागरिक पुलावर व नदीपात्रात कोठेही निर्माल्य टाकत आहेत. त्यामुळे नदीचे पावित्र धोक्यात येत आहे, तरी पालिका प्रशासनाने त्वरित निर्माल्यकलश पूर्ववत बसवावेत. तसेच पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने बसविण्यात आलेले लोखंडी पाइप कमी उंचीचे असल्यामुळे या ठिकाणी सायंकाळच्या वेळी बसण्यासाठी येणारे तरुण-तरुणी उत्साह दाखवत लोखंडी पाइप ओलांडून पलीकडील बाजूस जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. नदीच्या पावित्र्यासाठी पुलावर संरक्षक जाळी बसवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.(वार्ताहर)
निर्माल्यकलश गायब
By admin | Published: December 26, 2016 3:15 AM