तळेगाव दाभाडे : भारतीय जनता पक्ष व आरपीआयचे (ए) उमेदवार नितीन मराठे यांनी जिल्हा परिषदेच्या इंदोरी-सोमाटणे गटात २ हजार ५२३च्या मताधिक्याने विजय संपादित करून भाजपाचा हा अभेद्य गड कायम राखला. या विजयाने भाजपाने या गटात चौकार मारला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. या गटाचा मागील इतिहास पाहता भाजपाला अनुकूल असलेला हा गट आहे. मागील तीन निवडणुकांत भाजपाच्या सुमित्रा जाधव, प्रशांत ढोरे व सविता गावडे यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. या गटात माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निवासस्थान येते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे व दिगंबर भेगडे यांनी हा गट प्रतिष्ठेचा केला होता. प्रचारयंत्रणेत सुसूत्रता होती. याउलट याच गटात निवासस्थान असलेल्या राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने या गटाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. शिवसेना व कॉँग्रेस पक्षाला या गटात उमेदवार उभा करता आला नाही. नितीन मराठे हे पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य असून, वराळेगावचे माजी सरपंच आहेत. या गटातील नात्यागोत्यांचाही मराठे यांना चांगलाच फायदा झाला. मराठे यांना १२ हजार २७५ मते मिळाली असून, विठ्ठल शिंदे यांना ९ हजार ७५२ मते मिळाली. मराठे हे २ हजार ५२३च्या मताधिक्याने विजयी झाले. भाजपाच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात शिंदे यांना मिळालेल्या मतांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. रवींद्र किसन गायकवाड या अपक्ष उमेदवारास नगण्य मते मिळाली. मिनी आमदारकी म्हणून या गटाकडे पहिल्यापासूनच पाहिले गेले. इंदोरी सोमाटणे या गटामध्ये इंदोरी, सुदवडी, माळवाडी, वराळे, तळेगाव ग्रामीण, सोमाटणे, ओझर्डे, आढे, बेबडओहळ, पिंपळखुटे, उर्से, परंदवडी, धामणे, गोडुंब्रे, शिरगाव, गहुंजे, शिवणे, सडवली या गावांचा समावेश होतो. यातील भाजपाचा प्रभाव असलेल्या बहुतेक गावांमधून नितीन मराठे यांना मताधिक्य मिळाले आहे.पहिल्या फेरीपासूनच मराठे हे आघाडीवर होते. शेवटपर्यंत त्यांनी ही आघाडी कायम राखली. या गटाची लोकसंख्या ५४ हजार १८७ असून, भौगोलिकदृष्ट्या हा मोठा गट आहे. (वार्ताहर)सोमाटणे गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेस व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार साहेबराव कारके हे ३८८च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना पाच हजार ५६६ मते मिळाली. भाजपाचे उमेदवार उमेश बोडके यांना पाच हजार १७८ मते मिळाली. या निवडणुकीत नव्याने निर्माण झालेल्या सोमाटणे गणात भाजपाला पराभवास सामोरे जावे लागले.इंदोरी गणातून ज्योती शिंदे या भाजपाच्या उमेदवाराला पाच हजार ५९२ मते मिळाली, तर प्राजक्ता आगळे यांना तीन हजार ३०६ मते मिळाली. ज्योती शिंदे या दोन हजार २८६च्या मताधिक्यांनी विजयी झाल्या. इंदोरी गणातील भाजपाने ही जागा कायम राखली आहे.
नितीन मराठेंनी राखला भाजपाचा गड
By admin | Published: February 24, 2017 2:56 AM