- नारायण बडगुजर- पिंपरी : प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजीमंडईत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे येथील व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण तसेच भाजीमंडई असल्याने येथे नागरिकांची मोठी गर्दी असते. शहरातील प्रत्येक भागातील नागरिक येथे येतो. त्यामुळे या नागरिकांच्या आरोग्यास बाधा होऊन शहरात साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी नवीन घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. असे असले तरी कचरा संकलन होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील कचराकुंड्या कचऱ्याने ओसंडत आहेत. अशीच परिस्थिती पिंपरीतील भाजीमंडईत आहे. येथील कचरा उचलण्यात येत नसल्याने तो कुजून दुर्गंधी होत आहे. डुक्कर आणि मोकाट जनावरे हा कचरा पसरवतात. त्यामुळे येथे सर्वत्र कचराच-कचरा झाल्याचे दिसून येते. या कचºयात टाकून देण्यात आलेला हिरवा भाजीपाला मोठ्या प्रमाणात असतो. पावसाच्या पाण्यामुळे तो भाजीपाला कुजला आहे. त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या कचऱ्यावर घोंगावणाऱ्या माशा, डास आणि चिखलामुळे येथील वातावरण रोगट झाले आहे. पिंपरी रेल्वे स्टेशनला लागून असल्याने येथे शहराच्या विविध भागांतून, पुण्यातून तसेच मावळातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा राबता असतो. तसेच भाजीपाला खरेदी व विक्रीसाठी येणाऱ्याचीही संख्या मोठी आहे. मंडईलगतच बीफ विक्रीची दुकाने आहेत. तसेच मुख्य बाजारपेठही येथे आहे. त्यामुळे या परिसरात शहरातील प्रत्येक भागातील नागरिक खरेदी तसेच विविध कामानिमित्त येतात. मात्र येथील वातावरण रोगट असल्याने या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. साथीच्या आजारांची लागण होऊन शहरभर त्याचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. कचराकुंडीलगतच काही विक्रेते उघड्यावर भाजीपाला विक्री करतात. अस्ताव्यस्त पसरलेला कचरा, दुगंर्धी, माशा, डास अशा वातावरणात भर पावसात असे विक्रेते व्यवसाय करतात. पाऊस आणि कचऱ्यामुळे चिखल झालेला असतानाही दुकान मांडलेले असते. ग्राहकांना ये-जा करायलाही पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. चिखल तुडवत ग्राहक मार्ग काढतात.
स्वच्छतागृहातच अस्वच्छताहेपिंपरीतील भाजीमंडईतील कचराकुंडीलगत पुरुष व महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह आ. मात्र, त्याची नियमित स्वच्छता करण्यात येत नाही. तेथे मोठ्या प्रमाणात घाण झाली आहे. परिणामी पुरुष आणि महिलांना या स्वच्छतागृहाचा वापर करता येत नाही. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या परिसरात उघड्यावरच नैसर्गिक विधी केला जातो. त्यामुळेही येथे दुर्गंधी होत आहे.
कचरा उचलण्यासाठी नव्याने ठेका देण्यात आला आहे. पूर्वी कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळाचा वापर होत असे. मात्र नवीन ठेकेदार यंत्राच्या साह्याने कचरा उचलणार आहे. त्यासाठी जेसीबी व ट्रकचा वापर करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी काही प्रमाणात कचरा उचलला. उर्वरित कचरा रात्री उचलण्यात येईल.- महादेव शिंदे, सहायक आरोग्य अधिकारी, ह्यअह्ण क्षेत्रीय कार्यालय, महापालिका
........................
महापालिकेने नियमित कचरा उचलणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत उदासिनता दिसून येते. टाकाऊ तसेच शिळा भाजीपाला कचराकुंडीत टाकला जातो. मात्र, चिखल व घाणीमुळे कचराकुंडीपर्यंत पोहोचता येत नाही. परिणामी कचरा उघड्यावर टाकला जातो. याबाबत उपाययोजना झाली पाहिजे.- बाळासाहेब शिंदे, विक्रेता, भाजीमंडई, पिंपरी
भाजीमंडईतील कचरा नियमित उचलला जात नाही. त्यामुळे भाजीमंडईत आणि परिसरात दुर्गंधी असते. याचा त्रास ग्राहकांना होतो. माशा व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे येथील विक्रेते व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याबाबत वेळीच दखल घेऊन कचरा नियमित उचलणे आवश्यक आहे. - बाळासाहेब बोऱ्हाटे , विक्रेता, भाजीमंडई, पिंपरी