हिंजवडी: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हिंजवडीकर मैदानात उतरले. यावेळी, आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना आयटीनगरीत नो एन्ट्री याबाबत हिंजवडीकरांचा आक्रमक पावित्रा पहायला मिळाला. मंगळवार (दि.३१) रोजी हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरक्षणाच्या समर्थनार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यास, हिंजवडीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान, राज्यभरात प्रत्येक गावोगावी सकल मराठा समाज वतीने मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण करण्यात येत आहे.
आयटीपार्क हिंजवडीत सुद्धा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह तमाम नागरिकांनी एक दिवसीय उपोषणात सहभागी होत आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी, मुळशीतील मातंग समाज संघटना तसेच विविध संस्थांनी देखील हिंजवडीतील उपोषणास हजेरी लावून मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आपला जाहीर पाठिंबा दिला. हिंजवडी आयटीपार्क मधील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या एक दिवसीय उपोषण प्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत आयटीपार्क परिसर अक्षरशः दणाणून सोडला.
तर..... नेत्यांना हिंजवडीत नो एन्ट्री
एक दिवशी उपोषण प्रसंगी हिंजवडीकरांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत परिसर अक्षरशः दणानून सोडला. यावेळी, आमदार खासदारांसह विविध पक्षाच्या नेत्यांना आरक्षण मिळेपर्यंत हिंजवडीत पाऊल ठेवू देणार नाही असा आक्रमक पावित्रा सकल मराठा समाजाने घेतला. तसेच, शांततेत चाललेल्या आंदोलनाची सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर, यापुढे हिंजवडीकरांच्या आक्रमक आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी असा इशारा सकल मराठा समाज हिंजवडीच्या वतीने देण्यात आला.