पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत सदस्यांची जागा मिळविण्यासाठी शिवसेना आणि अपक्षांचा आटापिटा सुरू असून दोघांनीही गटनोंदणी केलेली नाही. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळणार की राष्ट्रवादीला याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. त्यात भारतीय जनता पक्षाला ७७, राष्ट्रवादी काँग्रेसला ३६, शिवसेनेला ९, अपक्षांना ५, मनसेला एक जागा मिळाली आहे. महापालिकेत स्वीकृत नगरसदस्य पदाच्या पाच जागा आहेत. महापालिकेतील संख्याबळानुसार तीन जागा सत्तारूढ भाजपा आणि २ जागा दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीला मिळणार आहे. महापालिका अधिनियमानुसार एक किंवा एकपेक्षा अधिक टक्के असणाऱ्या पक्षाला दुसरी जागा दिली जाते. त्यामुळे शिवसेनेचे ९ व अपक्ष ५ अशी एकत्रित गटाची नोंदणी झाली, तर शिवसेना एक स्वीकृत सदस्यपद मिळवू शकते. निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी एक महिन्याच्या आत गट नोंदणी करणे आवश्यक आहे. गटनोंदणीनंतर पक्षीय बलाबल निश्चित होऊ शकते. त्यामुळे स्वीकृतची एक जागा शिवसेनेला मिळावी, म्हणून अपक्षांचा आधार घेऊन गटनोंदणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आजपर्यंत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, मनसे यांनी गटनोंदणी केली आहे. मात्र, शिवसेनेने केली नाही. येत्या २३ तारखेपर्यंत गटाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)
स्वीकृतसाठी शिवसेनेची नाही गटनोंदणी
By admin | Published: March 21, 2017 5:21 AM