पुणे : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटवनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला होता. आता मात्र भाजपनं अश्विनी जगतापांचा पत्ता कट केला असून त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली. त्यामध्ये चिंचवडविधानसभा मतदार संघातून शंकर जगताप यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू शंकर जगताप हे तीव्र इच्छुक होते. मात्र, आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी या निवडणूक लढण्यावर ठाम होत्या. त्यामुळे शंकर जगताप यांनी एक पाऊल मागे घेत अश्विनी जगताप यांना संधी दिली. पोटनिवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली अश्विनी जगताप विरुद्ध महाविकास आघाडी कडून नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांनी अशी तिरंगी लढत झाली. मतविभाजनामध्ये जगताप यांचा विजय झाला.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शहराध्यक्ष म्हणून शंकर जगताप यांना संधी दिली. त्यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काही नगरसेवकांनी विरोध केला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर भाजपकडून शंकर जगताप की विद्यमान आमदार अश्विनी जगताप अशी चर्चा होऊ लागली. त्यावेळी त्यावेळी शंकर जगताप की अश्विनी जगताप अशी चर्चा शहरात रंगली होती. तसेच दोघांमध्ये आमदारकीच्या मुद्द्यावरून समेट घडवण्याची चर्चाही होती. त्यानंतर शंकर जगताप चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये कामाला लागले होते. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात त्यांनी मतदार संवादावर भर दिला. दरम्यानच्या काळामध्ये आमदार अश्विनी जगताप यांनी उमेदवारी कोणालाही मिळो, भाजपाचे काम करणार? शंकर जगताप उमेदवार असले तरी काम करणार अशी ठाम भूमिका घेतली होती. तर भाजपतील एका गटाने शंकर जगताप यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. तसेच राजीनामा नाट्यही झाले होते. त्यानंतर उमेदवारी अर्ज करण्याच्या दोन दिवस अगोदर भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या यादीमध्ये शंकर जगताप यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
महेश लांडगेंना निवडणूक लढवण्याची संधी
महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. चौरंगी लढतीमध्ये लांडगे विजयी झाले. त्यानंतर भाजप युती सरकारमध्ये भाजप संलग्न आमदार लांडगे होते. तसेच 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दुरंगी लढते महेश लांडगे दुसऱ्यांदा आमदार झाले. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड मधील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून केवळ लांडगे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर त्यांना विधानसभेच्या रणधुमाळीत उतरण्याची संधी भाजपनं दिली आहे.