पिंपरी : चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर घडलेल्या घडामोडी, व्यक्त केले जात असलेले तर्क-वितर्क यांमुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. चिंचवड पोलिसांनी धर्मादाय आयुक्तालय, तसेच विविध ठिकाणची उपनिबंधक कार्यालये यांच्याकडून माहिती मागवली आहे. त्यासंबंधीचा पत्रव्यवहार केला असून, या कार्यालयांकडून पोलिसांना अपेक्षित सहकार्य मिळत नाही, असे निदर्शनास आले आहे. देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दोन महिन्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचा पदाधिकारी तुकाराम चव्हाण याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. चव्हाण याने देवस्थानसंबंधीच्या तक्रारींची निवेदने धर्मादाय आयुक्तांना दिली होती. विश्वस्तांविरुद्ध आरोप केले होते. माहिती अधिकारात चव्हाण तसेच त्याचा सहकारी सुरेश पुजारी यांनी देवस्थानच्या जागेच्या खरेदी-विक्रीसंबंधीची माहिती मागविल्याचे काही कागदपत्र पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी त्या कागदपत्रांच्या आधारे तपासाला वेगळी दिशा दिली आहे. दोन महिने उलटून गेले, तरी धर्मादाय आयुक्त आणि उपनिबंधक कार्यालयाकडून पोलिसांना पुरेशी माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. महाराजांच्या कुटुंबातील कोणी सदस्य तक्रार नोंदवत नाही, विश्वस्तांकडून कोणावर संशय व्यक्त केला जात नाही. त्यामुळे पोलीस त्या दृष्टीने तपासाला गती देत नव्हते. काही दिवसांपूर्वी देवस्थानसंबंधीची महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली असल्याने तपासाला वेगळी दिशा मिळाली आहे. गुडघ्याच्या व्याधीने महाराज त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज बांधून तपास थंडावला होता. परंतु, आता महाराज यांच्या आत्महत्येमागे वेगळेच कारण असू शकते, असा पोलिसांचा संशय बळावला असून, त्या दृष्टीने तपासाची चके्र फिरू लागली आहेत. पोलिसांच्या हाती लागलेली महत्त्वाची कागदपत्रे, तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि विविध ठिकाणच्या उपनिबंधक कार्यालयाकडून उपलब्ध होणारी माहिती यातूून पोलिसांना या प्रकरणी खोलात जाऊन तपास करणे सोईस्कर ठरणार आहे. महत्त्वाचे धागेदोरे आणि ठोस पुरावे हाती लागण्याची दाट शक्यतानिर्माण झाली आहे. पोलिसांची तपास यंत्रणासुद्धा सक्षमतेने कार्यरत झाली आहे. (प्रतिनिधी)टोळके बिथरलेभ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पदाधिकारी तुकाराम चव्हाण याने लोणीकंद येथील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. चव्हाण याने चिंचवड देवस्थानविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिल्याचे निदर्शनास आले. महाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर शहरात वेगवान घडामोडी घडल्या. तर्क, वितर्क व्यक्त होऊ लागल्याने देवमहाराज यांच्या आत्महत्येचे गूढ आणखी वाढत गेले आहे. देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेविषयीचे गूढ वाढले असताना घडणाऱ्या वेगवान घडामोडींमुळे या प्रकरणी गुंतागुंतही वाढली आहे.
सरकारी कार्यालयांचा असहकार
By admin | Published: March 30, 2016 2:10 AM