पिंपरी : शहरात वाहतुकींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी पार्किंगचे धोरण राबवित असतानाच ‘नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट’चा कृती आराखडा तयार करणार आहे. सायकल शेअरिंग, पादचारी मार्ग, फीडर रूट असा विचार केला जाणार आहे.शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. नागरीकरण वाढत असताना मोठ्याप्रमाणावर वाहने रस्त्यावर येत असल्याने वाहतूककोंडीचा आणि वेळ पैशांचाही अपव्यय होत आहे. पुणे महापालिका परिसरात वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेण्याबाबतचे धोरण अवलंबिले होते. पुणे महापालिकेने सायकल शेअरिंगला प्राधान्य दिले आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांचे पुण्यात कौतुकही होत आहे. हाच उपक्रम पिंपरी-चिंचवडमध्ये राबिवण्याचे धोरण आहे. यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुढाकार घेतला आहे. नॉन मोटराईज ट्रान्सपोर्टसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे धोरण पालिकेने केले आहे.सायकल शेअरिंगला प्रोत्साहनयाबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात बैठक आणि सादरीकरण करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते. वाहतूक प्रश्न आणि उपाययोजना यावर बैठकीत चर्चा झाली. सायकल शेअरिंग संदर्भात सादरीकरणही करण्यात आले. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर वाढविण्याचे धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांचीही बचत होणार आहे. तसेच वैयक्तिक वाहन वापरही टाळण्यात येऊ शकतो. आराखडा तयार करून या संदर्भातील धोरण तयार करून सभेसमोर मांडण्यात येणार आहे.’’असे आहे ‘नॉन मोटराईज’चे धोरणनागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या आराखड्यात तीन गोष्टींचा विचार केला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पादचारी मार्ग, पदपथ आणि पार्किंगचा विचार केला जाणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकींचा वापर वाढविण्यासाठी उपाययोजनाही केल्या जाणार आहेत. तसेच वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी नागरिकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा, यासाठी फीडर रूटची निर्मिती करणे असा अभ्यास केला जाणार आहे.
शहरात नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट, प्रशासनाचा कृती आराखडा, सार्वजनिक वाहतूक सेवेला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 5:23 AM