पिंपरी : शासनाच्या आदेशाला हुलकावणी देऊन महापालिका शाळा सुरू झाल्यानंतरही अद्यापपर्यंत शाळेत आधारकार्ड काढण्याची कामे सुरू केली नाहीत. पहिल्या दिवशी अवघ्या सहा शाळांमध्येच आधारकार्डचे काम सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या लागल्यानंतर आधार मशीन नागरिकांकरिता उपलब्ध कराव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले होते. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर आधार मशीन तत्काळ विद्यार्थ्यांसाठी सुरू कराव्यात, असे आदेश गतमहिन्यातील आधार बैठकीत आधारचालकांना देण्यात आले होते. महापालिका शाळा २६ नोव्हेंबरला सुरू झाल्या. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतरही आधार मशीनचालक शाळेत उपस्थित राहिले नाहीत. आधारचालक शाळेत न आल्याने विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला. याकरिता ३० आधारकेंद्रचालक एजन्सी नेमण्यात आले आहेत. यातील सहा आधारचालक शाळांमध्ये दाखल झाले. यामुळे आधारकार्डच्या कामात दिरंगाई होत आहे. महापालिका शाळेच्या निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचे राहिले आहेत. महापालिका शाळाच अद्याप बाकी असताना खासगी शाळांचे आधारचे काम अद्यापपर्यंत सुरू नाही. तरीही आधारचालकांनी स्वहितासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान करून मशीन शाळेत दाखल केल्या नाहीत, हे वास्तव समोर आले आहे.(प्रतिनिधी)
‘आधार’ शाळेत नाही दाखल
By admin | Published: November 27, 2015 1:22 AM