स्वाती गाढवे म्हणाली, मी म्हातोबाची आळंदी-तरडे ग्रामीण भागात राहात आहे. येथे मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती अधिकच बिकट असते. मुलींवर अनेक बंधने असतात, त्यातच शिक्षणाची अवस्था आणखी वेगळी असते. अशा परिस्थितीमध्ये माझ्या परिवाराने पाठिंबा देऊन खेळ खेळण्यास परवानगी दिली. त्यामुळेच ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात व क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी पाऊल टाकले. २००४पासूनच मी अॅथलेटिक्स क्रीडाप्रकारामध्ये ५००० ते १०००० मीटर धावणे या खेळाला सुरुवात केली. २००७मध्ये जी स्कूल नॅशनल स्पर्धा प्लेस झाली त्यामध्ये दुसºया क्रमांकाने विजयी झाले. २००८ मध्ये पुण्यात आले. त्या वेळी मला भास्कर भोसले यांनी यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यासाठी खूप सराव घेतला. खूप मदत केली. २०१०मध्ये नॅशनल क्रॉस कंट्री स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्या कामगिरीच्या जोरावर मला रेल्वे खात्यात काम करण्याची संधी मिळाली. २०१२मध्ये चीनमध्ये झालेल्या इंटरनॅशनल एशियन क्रॉस कंट्री स्पर्धेत, तर २०१४मध्ये जपानमध्ये झालेल्या इंटरनॅशनल एशियन क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेतला. त्याच वर्षी इंटरनॅशनल स्पर्धेत तिसºया क्रमांकाने विजयी झाले. २०१५मध्ये जागतिक क्रॉस कंट्रीसाठी माझी निवड झाली. २०१६मध्ये साउथ एशियन स्पर्धेत २ वेळा विजेतेपद मिळविले व नंतर चीनमध्ये झालेल्या एशियन क्रॉस कंट्री स्पर्धेतही सहभाग घेतला.युरोपमधील डेन्मार्क या देशात झालेल्या जागतिक रेल्वे क्रॉस कंट्री स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला. सलग ४ वर्षे राष्ट्र्ीय क्रॉस कंट्रीमध्ये विजेतेपद मिळाले आहे. २०१७मध्ये मध्य प्रदेशात झालेल्या नॅशनल क्रॉस कंट्री स्पर्धेतही पहिला क्रमांक पटकाविला. यावर्षी चीनमध्ये होणाºया एशियन क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी माझी निवड झाली आहे. त्यासाठी सध्या माझा जोरदार सराव सुरू आहे. सातत्याने मिळालेल्या यशामुळे मला पुढे खेळण्याची प्रेरणा मिळत आहे. ग्रामीण भागात अनेक मुलींना विविध क्रीडाप्रकारात करिअर करण्याची इच्छा आहे. मात्र केवळ आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना स्वत:च्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देता येत नाही. त्यामुळेच त्यांना त्यांच्या शिक्षणाचा, स्वप्नांचा त्याग करावा लागतो. आज अनेक गावांमध्ये माध्यमिक शाळा नाही, त्यामुळे आठवीनंतर या मुलींना शिक्षणासाठी लांबच्या गावात ये-जा करावी लागते. त्यामुळे ग्रामीण भागात आठवीनंतर पुढील शिक्षणात मुलींचे गळतीचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक मुलींना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही. तसेच, घरच्या परिस्थितीमुळे खूप काही गमवावे लागते. शासनाच्या वतीने शिक्षण सर्वच भागात देण्याचे नियोजन असले तरी हे ग्रामीण भागात पुरेशा इमारती, शिक्षक आणि इतर सुविधा या शहरी भागाच्या तुलनेत अल्पच असतात. परिणामी ग्रामीण भागातील मुले-मुली शैैक्षणिक तसेच विविध क्रीडा प्रकारात काही प्रमाणात मागे पडत असल्याचे चित्र पाहायला मिळते, असे स्वाती गाढवे हिने सांगितले.शिक्षणाशिवाय सामाजिक प्रगती आणि व्यक्तिमत्त्व विकास नाही हे वास्तव असले तरी आज शिक्षण पद्धतीमध्ये असलेली शहरी व ग्रामीण दरी कमी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुला-मुलींचा आवडत्या गोष्टीमध्ये कल पाहून त्यांना त्यांच्या पालकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मुलींना घरचा पाठिंबा तसेच योग्य मार्गदर्शक असणेदेखील महत्त्वाचे आहे. मुली कोणतेही काम जिद्दीने, चिकाटीने करतात. त्याचबरोबर त्यांना योग्य सल्ला मिळाला, तर त्या मोठ्या यशाच्या शिखरापर्यंतही पोहोचतात. त्यासाठी त्यांना घरातून मोठ्या आधाराची गरज असते. मुलींच्या शिक्षणासाठी समाजाने, आई-वडिलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, एक मुलगी शिकली की कुटुंब शिकते, कुटुंब शिकले की समाज आणि समाज शिकला की देश प्रगतिपथावर जातोच. हे लक्षात घेतले तर अनेक गोष्टी सहज सोप्या होऊन जातील, असे याप्रसंगी स्वाती गाढवे हिने सांगितले.
माझ्या नाही... त्यांच्या कष्टाचे चीज झाले - स्वाती गाढवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 2:43 AM