पिंपरी : सुरक्षित वाहतूक होण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागातर्फे दोन महिन्यांपासून घरपोच नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुुरू झाली आहे. त्यानुसार उद्योगनगरीतील वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या साडेसतराशे जणांना दंडाच्या नोटीस पाठविण्यात आल्या असून, त्यांच्याकडून चार लाखांचा दंड वसूल केला आहे. शहरातील प्रत्येक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त चालकांवर कारवाई सुरूच असते. मात्र, ज्या वेळी पोलीस नसतात आणि पोलीस असतानादेखील पोलिसांना गुंगारा देऊन पळून जातात, अशा बेशिस्त चालकांवर सीसीटीव्हीची नजर असते. वाहतूक विभागातर्फे घरपोच दंडात्मक कारवाईच्या नोटीस पाठविल्या जात आहेत. ही प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबविणे, भरधाव वेगात गाडी चालवणे, मोबाइलवर बोलणे, सीटबेल्ट न लावणे अशा प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन घरपोच आंतरदेशीय पत्राद्वारे दंडाच्या नोटीस पाठविण्यात येत आहेत.अशी होते कारवाई...दंडात्मक कारवाईमध्ये झेब्रा काँसिंगवर गाडी थांबवल्यास २०० रुपये, सिग्नल तोडणे २०० रुपये, सीटबेल्ट न लावणे व मोबाइलवर बोलणाऱ्यासही २०० रुपयांची नोटीस पाठविण्यात येत आहे. अशा बेशिस्त चालकांवर कारवाईसाठी वाहतूक विभागातर्फे पुणे व पिंपरी-चिंचवडसह एकूण १ हजार २३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत परिमंडळ तीनमधील वाहतूक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, हिंजवडी, सांगवी व चतु:शृंगी या विभागातून एकूण एक हजार, ७६५ बेशिस्त चालकांना दंडाच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ३ लाख, ९६ हजार, १०० रुपये इतका दंडदेखील वसुल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
शिस्तभंग करणाऱ्या १७५० जणांना नोटीस
By admin | Published: November 18, 2016 5:03 AM