पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच नवीन ग्राहकांना वीज मीटर लवकरात-लवकर उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना देखील केल्या. भोसरी विधानसभा विद्युत समितीची पहिलीच आढावा बैठक भोसरीत पार पडली. आमदार व समितीचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता तथा समितीचे सह अध्यक्ष मदन शेवाळे, नगरसेवक व समितीचे सदस्य राहुल जाधव, कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे, विकास डोळस, सागर गवळी, उत्तम केंदळे, नगरसेविका व सदस्या सारिका बोऱ्हाडे, सोनाली गव्हाणे, अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, उपविभागीय अभियंता बापूराव भरणे, ग्राहक प्रतिनिधी मच्छिंद्र दरवडे, परिक्षित वाघेरे, निलेश भालेकर, राहुल शिंदे, सम्राट भागवत, अशासकीय प्रतिनिधी सुहास ताम्हाणे बैठकीला उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीमध्ये येत्या २०१८-१९मध्ये घेण्यात येणाऱ्या कामाचा आराखडा तयार करणे. भोसरी मतदार संघातील विद्युत विभागाशी नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे. नवीन ग्राहकांना वीज मीटर लवकरात-लवकर उपलब्ध करुन देणे. महावितरणच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे. नवीन प्रस्ताव तत्काळ मंजुर करुन घेऊन कामे सुरु करावेत, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केल्या आहेत. समितीच्या सदस्यांच्या भागातील तक्रारींचा आढावा घेण्यात आला. तसेच पूर्ण झालेली कामे व प्रस्तावित कामांचा यासह इतर प्रलंबित विषयांबाबत आमदाल लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आला.
विविध योजनांतील पूर्ण झालेली, प्रगतीपथावर असलेली व प्रस्थापित कामे :भोसरी विभागांतर्गत आकुर्डी, भोसरी व प्राधिकरण हे तीन उपविभाग असून या तीन उपविभागात संभाजीनगर, चिंचवड, मोशी, भोसरी, नाशिक रोड, चऱ्होली, निगडी, प्राधिकरण, देहूरोड, देहूगाव आणि तळवडे अशा नऊ शाखा कार्यालयेत आहेत. भोसरी विभागात सध्या ५३८ उच्चदाब, दोन लाख ११ हजार ७५१ घरगुती, २३हजार ७२३ व्यापारी, ११ हजार ४७७ औद्योगिक, १ हजार ६४९ शेती व १ हजार २१२ इतर असे एकूण दोन लाख ४९ हजार ८१२ वीज ग्राहक आहेत. या सर्व वीज ग्राहकांना चिंचवड, भोसरी-१, भोसरी २ आणि टेल्को अति उच्च दाब उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येत आहे. विविध योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामामुळे वीज हानी कमी होऊन वीज ग्राहकांना सुरळीत व योग्य दाबाने वीज पुरवठा करणे, तसेच नवीन येणाऱ्यांना वीज पुरवठा देणे शक्य झाले आहे. डीपीडीसी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे अजून वीज गळती कमी होऊन योग्य दाबाने वीजपुरवठा करणे. नवीन मागणी असलेल्या वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.